औरंगाबाद : राज्यभरात गाजलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंबंधातील तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींना अद्याप का अटक झाली नाही? असा सवाल करतानाच औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे १२ आॅगस्ट २०१५च्या आदेशानुसार तपासकामावर देखरेख करण्यास अपयशी ठरल्याचे ताशेरेही खंडपीठाने ओढले आहेत.या गैरव्यवहाराच्या तपासाची प्रगती तपासअधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून द्यावी. ते जातीने लक्ष घालतील आणि तपास कामाबाबत योग्य ते निर्देश देतील. पुढील सुनावणीच्या वेळी यासंदर्भात काय पावले उचलली आहेत याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असेही न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.एल. वडणे यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले. याचिकेची पुढील सुनावणी १३ जून रोजी होणार आहे. या प्रकरणात ‘वसुली प्रमाणपत्रे’ आणि सहकार कायद्याच्या कलम ८८नुसार आदेश देऊनही राज्य शासनाने गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्यासाठी पावले उचलली नाहीत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात एकूण १३१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १२४ गुन्ह्यांचा तपास झाला व १०५ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. असे असताना आरोपींच्या अटकेसंदर्भात माहिती दिली नाही.सर्वांना सारखी वागणूक द्यासर्व आरोपींना सारखी वागणूक द्या, अशी अपेक्षा व्यक्त करून तपास यंत्रणेने उत्तर दाखल करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. क्रिमीनल लॉ अमेंडमेन्ट आॅर्डिनन्स १९४४ च्या कलम ३, ४ आणि ६नुसार कसुरदारांची मालमत्ता शासनाने जप्त करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. अनेक बडे नेते आरोपी : या बँकेतील साडेसातशे कोटींचा घोटाळा २०१२मध्ये पुढे आला. बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे हे अनेक महिने फरार होते, त्यांना नंतर अटक झाली. पुढे त्यांची जामिनावर सुटका झाली. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, भीमराव धोंडे अशा मातब्बर नेत्यांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. बोगस संस्था आणि बोगस सेवा सहकारी संस्थांना कर्ज देण्यात आल्याचा ठपका या तत्कालिन संचालकांवर आहे. यामुळे १२०० कोटी ठेवी असणारी बँक उद्ध्वस्त झाली. परिणामी प्रशासक नेमण्याचीही नामुष्की ओढावली होती.
आरोपींना अटक का नाही़?
By admin | Published: May 06, 2016 2:26 AM