पुणे: भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा २०१७ मध्येच झाली होती. मंत्रिपदंही ठरली होती. मात्र शिवसेनेसोबत आमचं जमणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीनं सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, असं गौप्यस्फोट भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. शेलारांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपकडून २०१७ मध्ये राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याची ऑफर होती. मंत्रिपदं ठरली होती. पण राष्ट्रवादीनं नकार दिला, हे सगळं आशिष शेलार आता का सांगताहेत? त्यांनी हे आधीच सांगायचं ना. पाच वर्षानंतर अचानक आता आशिष शेलारांना हे आठवलं का? इतकी वर्षे का थांबले होते?, असे प्रश्न पवारांनी उपस्थित केले.
पाच वर्षांपूर्वी काहीतरी घडल्याचा दावा आशिष शेलार करत आहेत. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. त्यावेळी अनेक नेते इकडे तिकडे होते. त्यांची विधानं वेगवेगळी होती, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. सध्या राज्यासमोर वेगळ्या समस्या आहेत. राज्यातील प्रश्न वेगळे आहेत. त्यावर आपण बोलू, असं पवार म्हणाले.
काय म्हणाले होते आशिष शेलार?देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन वर्षांपूर्वीच अर्थात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती. भाजपाला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी असे वाटू लागले होते. शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार करू, असा घटनाक्रमच आशिष शेलार यांनी सांगितला.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिला. आम्ही तेव्हा म्हटले की, तीन पक्षांचे अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीने याला नकार दिला. आमचे शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने शिवसेनेला सोडायला नकार दिला. पण २०१९ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली, असे आशिष शेलार यांनी सांगितले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आशिष शेलार बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असे तेव्हा म्हटले होते, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की, जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजप आहे, असे सांगत आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.