पुणे : एकीकडे उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे नवनीत राणा यांचे काही फोटो व्हायरल करुन अश्लील भाषेत टिपण्णी करण्यात आली आहे. राजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र, स्वत:चे कर्तृत्व सिध्द करणाऱ्या स्त्रीवर अश्लील टिपण्णी केली, चारित्र्यहनन केले की तिला मागे ओढता येईल, अशी मानसिकता आजही समाजात पाहायला मिळते. अशा घटनांमध्ये राजकीय, स्त्री-पुरुष असे भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.पूर्वीपासून महिलांना समाजाकडून टीका-टिपण्णीला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असताना आक्षेपार्ह वर्तन, ‘कमेंट्स’ असे प्रकारही अगदी हातातल्या मोबाईलवर येऊन ठेपले आहेत. आक्षेपार्ह घटनांकडे दुर्लक्ष न करता, कायद्याचा आधार घेत महिलांनी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे मत विविध स्तरांतील महिलांकडून नोंदवले जात आहे.‘लोकमत’शी बोलताना अॅड. रमा सरोदे म्हणाल्या, ‘आक्षेपार्ह पोस्ट, अश्लाघ्य वर्तन याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली जाऊ शकते. निर्भया केसनंतर बलात्कार, विनयभंगाच्या कायद्यात बदल झाले आहेत. त्यानुसार, कलम ३५४ अ अंतर्गत आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. इंटरनेटवरुन केला जाणारा पाठलाग, टिपण्णी, ट्रोलिंग याविरोधात कलम ३५४ ड अंतर्गत तक्रार नोंदवता येते. त्याचप्रमाणे, आयटी अॅक्ट, सायबर लॉअंतर्गतही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.’महिला संपर्क समितीच्या सदस्या आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील प्रा. उज्वला मसदेकर म्हणाल्या, ‘महिलेवर अशा पध्दतीने अत्याचार होत असल्यास राजकीय पक्षाने याबाबत ठाम भूमिका घ्यायला हवी. काही वर्षांपूर्वी सेक्स वर्करवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या कामावरुन शेरे ओढण्यात आले होते. महिला कोणत्याही व्यवसायात असली तरी तिच्यावर वैयक्तिक हल्ला करणे चुकीचेच आहे. आपण पुन्हा उलट्या दिशेने प्रवास करत आहोत की काय, असे वाटू लागले आहे. वैचारिक विरोध न करता वैयक्तिक शेरेबाजीमध्ये काही जण धन्यता मानतात. अशा कृत्याचा सर्वच स्तरातील महिला आणि पुरुषांनी निषेध केला पाहिजे.’......महिला पत्रकारांवर अश्लील टिपण्णी करण्यापासून अशा प्रकारांना सुरुवात झाली. केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर कोणतीही महिला जेव्हा स्वत:चे मत मांडते, स्वतंत्रपणे उभी राहते, तिला बोलूच दिले जात नाही. महिला या सॉफ्ट टार्गेट असतात. सुप्रिया सुळेंनाही वाईट पध्दतीने ट्रोल केले जायचे. त्यावेळी आयटी अॅक्टअंतर्गत तक्रारी दाखल केल्या होत्या. बºयाचदा, तक्रार दाखल झाल्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. गृहमंत्रालयाकडून कठोर पावले उचलली जात नाहीत, ही शोकांतिका आहे. यासाठी महिलांनीच याविरोधात बोलले पाहिजे.- अॅड. वंदना चव्हाण, खासदार........राजकीय पक्ष ही नोंदणीकृत संस्था असते. बरेचदा पक्षातले लोकच महिलेची बदनामी करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी, राजकीय पक्ष हे महिलेचे कामाचे ठिकाण असल्याने कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक अत्याचाराचा कायदाही लागू व्हावा. अशा घटना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. - अॅड. रमा सरोदे