Vinod Tawde Ajit Pawar News: महायुतीचे जागावाटप करताना भाजपने अनेक मतदारसंघ अजित पवारांना देताना स्वतःच्या पक्षातून उमेदवारही दिले. या मुद्द्याची राजकीय वर्तुळात आणि राज्यात चर्चा झाली. या तडजोडींचं कारण भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीरपणे सांगितले.
लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी विनोद तावडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणूक, महायुतीचे जागावाटप, आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले.
उमेदवार नसताना अजित पवारांना जागा का दिल्या?
तुम्हीच अजित पवारांना १०-१३ उमेदवार पुरवले, या मुद्द्यावर उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले, "आम्ही त्यांना दिले. त्यांनी आम्हाला दिले. त्यांनी त्यांना दिले", असं झालं.
हे का करावं वाटलं, कशासाठी? त्यांच्याकडे उमेदवार नाहीत ना, तर त्यांनी त्या जागा घेऊ नयेत. तुम्ही त्या जागा घ्याव्यात. अट्टाहास कशासाठी? या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले, "असंय की, जागांचा आकडा हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बनवत असतो. त्यासाठी त्या-त्या पक्षाला आवश्यक होता आणि महायुती म्हणून एकसंघ राहणं, ही आजची गरज आहे."
तावडे पुढे म्हणाले की, "त्यामुळे उगाच जागावाटपावरून भांडण करण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, तुम्ही घ्या... उमेदवार नाहीये, हा घ्या. असं करून ते आम्ही केलं. (उमेदवारासहित जागा दिल्या) पूर्ण."
अजित पवारांना महायुतीत का घेतलं?
लोकसभेला अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झाल्याचं दिसलं. तसा मतप्रवाह असताना पुन्हा अजित पवारांना सोबत का घेतलं? असा प्रश्न तावडे यांना विचारण्यात आला.
विनोद तावडे म्हणाले, "१४०-१५० इतकं बहुमत भाजप-शिंदे शिवसेनेनेकडे होतं. इतक्या कमी बहुमतावर सरकार नीट चालवणं शक्य नसतं. त्यावेळी अजित पवारांचा मोठा ४०-४२ लोकांचा गट येतोय. तर तो आला, तर मग लाडकी बहीण असेल, शेतकरी शून्य बिल असेल, असे निर्णय करणं सोप्पं होतं. मजबूत सरकार असेल, तर मजबूत निर्णय घेता येतात. म्हणून अजित पवारांना घेतलं होतं", असे विनोद तावडे म्हणाले.