राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघत आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. यातच बुधवारी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही बैठक कशासाठी बोलावण्यात आली होती? यासंदर्भात खुद्द मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.
वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना उदय सामंत म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक, आगामी लोकसभा अधिवेशन, राज्याचे विधानसभा अधिवेशन, आमदार आणि खासदारांनी भविष्यात कशा पद्धतीने काम करायला हवे, विकासाची कामे कशा पद्धतीने करावी, सघंटना वाढविण्यासाठी काय करायला हवे, यासंदर्भात झाली.
याच वेळी, आमच्या आमदारांमध्ये कसल्याही प्रकारची नाराजी नाही (अजित पवार सरकारमध्ये आल्याने). आम्हा सर्वांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या राजीनाम्या संदर्भातील चर्चा म्हणजे केवळ अफवा आहे. सर्व खासदार आणि आमदारांची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.