गेल्या सहा महिन्यांपासून अजित पवार आणि शरद पवार कुटुंबीयांत वर्चस्वाची लढाई सुरु असताना लोकसभा निवडणूक लागली. यावेळी अजित पवारांनीसुप्रिया सुळेंविरोधात पत्नीलाच उमेदवारी देत अख्ख्या पवार कुटुंबाविरोधात वैर घेतले. बारामतीचे राजकीय वातावरण तापलेले असताना पार अगदी मिशा काढण्याच्या आव्हानापर्यंत गोष्ट गेली. अशावेळी आज मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी गेल्याने ही कोणती नवी गुगली असा प्रश्न बारामतीसह राज्यातील कार्यकर्त्यांना पडला होता.
यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरातून बाहेर येताच उत्तर दिले आहे. अजित पवारांची आई पुण्याला जाऊन राहिली असल्याची टीका भाऊ श्रीनिवास पवार यांनी केली होती. आज अजित पवार त्यांच्या आईला मतदानाला सोबत घेऊन आले. आशाकाकू आवर्जून मतदानाला आल्या म्हणून त्यांना भेटायला गेल्याचे कारण सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच काटेवाडीतल्या घरी अजित पवार किंवा सुनेत्रा पवार नव्हत्या, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
माझे बालपण काकींकडेच गेले आहे. माझ्या आईने जेवढे केले नसेल तेवढे काकींनी केले आहे. त्यांच्या हातचे चपातीचे लाडू खूप छान असतात. हे माझ्या काका-काकींचे घर आहे. आम्ही फिरत फिरत नेहमीच येत असतो, असे सुळे म्हणाल्या. मी दर उन्हाळी सुट्टीत इकडे असायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सातत्याने सुप्रिया सुळेंकडून आमचे राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत असं सांगितले जात होते. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीच्या राजकीय आखाड्यात शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे आहेत. यामुळे ही भेट नवीन खेळी की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.