सावंतवाडी : तुम्हाला अर्नेस्ट जॉन, दिवान बिल्डर चालतात, मग मीच धंदा करीत असेल तर का चालत नाही, असा खडा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांना केला. तुम्ही दुसऱ्यांची कुटुंंबे उभी करता मग आमचे कुटुंब उद्ध्वस्त करायला का निघालात, असेही तेली म्हणाले.आरोंदा येथे बुधवारी नारायण राणे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी मनोज नाईक, राजू गावडे, उमेश कोरगावकर, अमित परब, आनंद नेवगी उपस्थित होते.यावेळी तेली म्हणाले, आरोंदावासीय आतापर्यंत शांततेच्या मार्गाने लढा देत होते. मग सोमवारीच दगडफेकीसारखा प्रकार कसा घडला, कोण बंदराची पाहणी करत असतील तर त्याला मी कधीच विरोध केला नाही. अनेक नेते येऊन बंदराची पाहणी करून गेले, पण कोणीही चिथावणीखोर भाषा केली नाही. आरोंदा येथील अनेक ग्रामस्थ हे नेहमीच माझ्या बाजूने राहिले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासही मी तयार आहे, असे सांगत तेली यांनी माझ्याकडे शासनाने बंदरासाठी ज्या काही परवानग्या दिल्या आहेत. त्याची पूर्ण कागदपत्रे आहेत. बेकायदेशीररीत्या कोणतेही काम केलेले नाही, असेही तेली यांनी सांगितले.रेडी बंदराबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल कधी काँॅग्रेसने घेतली नाही. तेथे मच्छिमारी होत नाही का आणि आरोंदा येथे मच्छिमारी होते, मग त्यांना आम्ही कधीच विरोध केला नाही. त्यांचे झालेले नुकसानही आम्ही भरून देण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नारायण राणे यांच्याबद्दल माझा कोणताही राग नाही, पण राणे यांनी सर्व बाबी तपासून वक्तव्ये केली असती तर बरे झाले असते, असे यावेळी तेली म्हणाले.येत्या काळात आरोंदा येथे झालेल्या सर्व घटनेबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती पटवून सांगणार आहे. तसेच बंदर अधिकारी प्रदीप आगाशे यांच्या कामात झालेला हस्तक्षेपही मुख्यमंत्री तसेच उच्चस्तरीय पोलीस अधिकारी यांच्या लक्षात आणून देणार आहे. काँग्रेस नेते सांगतात की, अनेकांची कुटुंबे बसवली, पण राजकीय सुडापोटी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्यास निघाले आहेत. ते त्यांनी थांबवावे, असे आव्हानही तेली यांनी केले.जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी करणारसिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकारांचा गैरवापर करीत आहेत. त्यांचा आतापर्यंतचा सर्व कारभार तपासावा आणि ही जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे राजन तेली यांनी स्पष्ट केले.
माझेच कुटुंब उद्ध्वस्त करायला का निघालात ?
By admin | Published: January 09, 2015 8:52 PM