मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या भेटीनं महाराष्ट्रसह दिल्लीत विविध चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी अहमदाबाद येथील अदानींच्या घरी ही भेट झाली. ज्यावरून भाजपाने इंडिया आघाडी आणि काँग्रेसला टोले लगावले आहेत. त्याचसोबत राहुल गांधींनाही घेरले आहे. कारण सातत्याने अदानींची भाजपाशी जवळीक असल्याचा आरोप केला जातो. शरद पवार गौतम अदानींना का भेटले? यावर आमदार जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, इंडिया आघाडीत सर्व चर्चा सर्व नेत्यांद्वारे केली जाते. शरद पवार हे गौतम अदानींना ओळखतात, अदानींना एका कार्यक्रमासाठी पवारांना निमंत्रण दिले होते. त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तो फक्त एक कार्यक्रम होता जिथे शरद पवारांनी उद्घाटन केले. शरद पवारांनी नेहमी इंडिया आघाडीकडून घेतलेल्या निर्णयांचे समर्थन केले आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
अहमदाबाद इथं एका कार्यक्रमासाठी शरद पवार पोहचले होते. ज्याठिकाणी गौतम अदानींसोबत पवार फित कापताना दिसले. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर या खासगी कार्यक्रमानंतर शरद पवार गौतम अदानी यांच्या घरी आणि ऑफिसलाही गेले. शरद पवारांनी एक्सवर लिहिलं की, गौतम अदानी यांच्यासमवेत वासना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हे सन्मानास्पद होते असं त्यांनी सांगितले. शरद पवार आणि गौतम अदानी यांची यापूर्वीही दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला गौतम अदानी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली होती. शरद पवार आणि गौतम अदानी यांची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी भेट आहे.
भाजपा म्हणतं, अदानी शरद पवारांचे मित्र
शरद पवार यांच्या मनात काय आहे? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे गौतम अदानींचे मित्र आहेत. गौतम अदानी हे शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.