- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच आठ महिने आधी त्याची तुरुंगातून सुटका का करण्यात आली? वेळेपूर्वीच सुटका करण्याचा निर्णय घेण्याआधी कोणत्या प्रक्रिया पार पाडण्यात आल्या? याबद्दल स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले.१९९३च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याने संजय दत्तला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तुरुंगातील चांगल्या वर्तनाबद्दल फेब्रुवारी २०१६मध्ये त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच आठ महिने आधी त्याला शिक्षेतून सूट देण्यात आल्यासंदर्भात व तो कारागृहात असताना त्याची वारंवार पॅरोल व फर्लोवर सुटका केल्याबद्दल आरटीआय कार्यकर्ते संजय भालेराव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्या. आर.एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.या वेळी ‘चांगले वर्तन’ ठरवण्यासाठी काय निकष लावण्यात आले? संजय दत्तला दया दाखवणे आवश्यक आहे, हा निष्कर्ष काढताना कोणत्या प्रक्रिया पार पाडल्या व कोणते निकष लावले, अशा प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केली.संजय दत्तला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी सोडण्याचा निर्णय घेताना कारागृह अधीक्षकांनी उपमहानिरीक्षकांशी (तुरुंग) सल्लामसलत केली होती का? की, त्यांनी थेट राज्यपालांकडे शिफारस केली, असेही खंडपीठाने सरकारला विचारले. तसेच ‘संजय दत्त अर्धाअधिक वेळ कारागृहाबाहेर असतानाही त्याची वर्तणूक चांगली आहे, हे प्रशासनाने कशाच्या आधारावर ठरवले? हे ठरवण्यासाठी प्रशासनाला केव्हा वेळ मिळाला?’ असे प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. आॅक्टोबर २०१३मध्ये संजय दत्तची फर्लोवर सुटका करण्यात आली. या फर्लोमध्ये १४ दिवसांची वाढ देण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१३मध्ये ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला, यामध्ये दोनदा वाढ करण्यात आली. संजय दत्त एकूण १४६ दिवस कारागृहाबाहेर होता.१४६ दिवस कारागृहाबाहेर- आॅक्टोबर २०१३ मध्ये संजय दत्तची फर्लोवर सुटका करण्यात आली. या फर्लोमध्ये १४ दिवसांची वाढ देण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१३मध्ये ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला, यामध्ये दोनदा वाढ करण्यात आली. संजय दत्त एकूण १४६ दिवस कारागृहाबाहेर होता.