शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी फडकावलेल्या बंडाच्या झेंड्यानंतर, राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर एकनाथ शिंदे भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी आज (बुधवार, २० जुलै) सुनावणी होणार आहे. यासंदर्भात, पक्षांतर बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राऊत म्हणाले, सुनावणी सुरू होईल, पण आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही. आमचेही लक्ष आहे. आम्हाला वाटते, की सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल आणि लोकशाहीची उघडपणे हत्या कुणी करू शकणार नाही. यासंदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल याची खात्री आहे. कारण कायदा आणि घटनेची पायमल्ली करून फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षांतर बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.
ते ज्यो बायडेन यांचे घरही ताब्यात घेतील -संसदेच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाची फुटीर गट मागणी करत आहे, असे विचारले असता राऊत म्हणाले, फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करेल. त्यांना शिवसेनेचा ताबा हवा आहे. त्यांना सामना हवा आहे, एक दिवस ते ज्यो बायडेन यांचे घरही ताब्यात घेतील. बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ पक्ष आमचाच आहे, बाळासाबेहांनाही आम्हीच पक्षात आणलं, उद्धव ठाकरेंनाही आम्हीच पक्ष प्रमुख केले, असेही ही सांगायला ते कमी करणार नाहीत. काल १२ खासदारांचा जो फुटीर गट भाजपच्या प्रेरणेने सोडून गेले. कोणत्या मजबुरीने त्यांनी आम्हाला सोडले माहीत नाही. राजकीय कारण अजिबात नाही. प्रत्येकाची एक वेगळी मजबुरी आहे आणि काही कारण आहे. बाकी हिंदूत्व केवळ तोंडिलावायला आहे.