घराला आग लागली असेल तर आधी ती बुझवावी लागते. नंतर एकत्र येता येते. मी आदित्य ठाकरेंशी बोलत बोलत हॉ़टेलवर आलो. तुम्ही सगळे मिळून जे करू शकला नाही, ते मी एकट्याने केले आहे. अजय चौधरी तिथे आले, सुनील शिंदे आले, माझी गाडी निघाली, माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. मी त्यांना फोन करून सांगितले मी हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा सावंतवाडीचे शिवसेना आमदार आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.
जे आमदार गेले ते आज सांगत होते का, त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे होते. त्यांना बळ दिले जात होते. याचा अर्थ काय? आम्हाला उद्धव ठाकरे साहेब उपलब्ध होत नव्हते. यामुळे या आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे आपल्या कैफियती मांडल्या. यामुळे हे सारे आमदार शिंदेंच्या जवळ गेले. त्याच्यामागची भूमिका मी उद्धव ठाकरेंना काल समजावली. हे उद्धव ठाकरेंशी बंड नाहीय. आपल्याला भाजपासोबत जावे लागेल, असे दीपक केसरकर म्हणाले.
मी कोणाला घाबरत नाही. मी देखील शिंदे यांच्याकडे जाऊ शकतो. मला कोण अडवणार, मी पोलीस आयुक्तांना फोन करेन. कायदा सुव्यवस्था आहे. आमचा मान ठेवायला हवा होता, माझ्या घरी आज माणसे पाठविली, असा आरोप केसरकर यांनी युवासेनेने दिलेल्या वागणुकीवर केला आहे.
आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे काम केले गेले. भाजपामध्ये एक नेता बसविण्यात आला. त्यामुळे कुटुंबाची बदनामी भाजपाकडून होतेय, ही उद्धव ठाकरेंची समज झाली. पंतप्रधान आणि ठाकरे यांच्यात चांगले प्रेमाचे संबंध आहेत. परंतू कुटुंबाची बदनामी होऊ लागल्याने भाजपा आणि ठाकरेंत अंतर वाढत गेले, असा आरोप त्यांनी एका नेत्याचे नाव न घेता केला. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करणार नाही. त्यांनी शिंदेंची भूमिका मान्य करावी, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत न जाता भाजपासोबत जावे, ही भूमिका त्यांना माहिती आहे, शेवटी निर्णय घेणे ठाकरेंच्या हातात आहे. गेले दोन वर्षे मी त्यांना हेच सांगत आलोय, असेही केसरकर म्हणाले.