मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:15 PM2024-05-07T16:15:08+5:302024-05-07T16:15:37+5:30
ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Supriya Sule ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या सामना रंगत असून या लढतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचारकाळात पवार कुटुंबात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले. मात्र आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांचे घर गाठत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर यंदा सुनेत्रा पवार यांच्या रुपाने तुल्यबळ उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे सुळे यांना खडतर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे 'इमोशनल कार्ड' वापरून प्रचाराची सुरुवात करणाऱ्या सुप्रियाताईंच्या प्रचाराची सांगताही भावनिकच झाली होती. दुसरीकडे, अजित पवार यांनी यापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका घेत, विकासाच्या मुद्द्यावर भर दिला होता.
या पार्श्वभूमीवर, आज मतदान सुरू झालं आणि थोड्याच वेळात सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी पोहोचल्याची बातमी आली. त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकूण वातावरण पाहून मनात धाकधुक वाढल्यानेच सुप्रियाताईंची ही धावपळ असल्याचा सूर बारामतीत ऐकू येतोय. अजित पवार आईसोबतच मतदानाला गेले आणि आई आपल्या बाजूने असल्याचा 'मेसेज' मोक्याच्या क्षणी मतदारांपर्यंत गेला. त्याचा फटका बसू नये, यासाठी सुप्रिया सुळेंनी हे पाऊल उचलल्याचंही काही जण म्हणत आहेत.
त्याचवेळी, ही पवारांची खेळी आहे, आपण कुटुंब म्हणून एकच आहोत, हे पटवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या भेटीमुळे सुप्रिया सुळेंच्या समर्थकांच्या मनातही किंचित चलबिचल झालीय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही या भेटीवर निशाणा साधला आहे. या भेटीच्या निमित्ताने मतदारसंघात भावनिक वातावरण निर्माण करण्याची ही राजकीय खेळी खेळल्याचा आरोप सुळे यांच्यावर केला आहे.
दरम्यान, या भेटीवर स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, "माझे बालपण काकींकडेच गेले आहे. माझ्या आईने जेवढे केले नसेल तेवढे काकींनी केलं आहे. त्यांच्या हातचे चपातीचे लाडू खूप छान असतात. हे माझ्या काका-काकींचे घर आहे. आम्ही फिरत फिरत नेहमीच येत असतो. आशाकाकू आवर्जून मतदानाला आल्या म्हणून त्यांना भेटायला आले होते," असं सुळे यांनी म्हटलं आहे.