लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मविआ सरकारशी फारकत घेऊन शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर यामिनी जाधव, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, भावना गवळी या नेत्यांची ईडी चौकशी कशी थांबली, अशी विचारणा करत, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून, ईडी पक्षपातीपणा करत आहे. त्यामुळे ईडीच्या तपासाचा तपशील मागवून घ्यावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका हायकाेर्टात दाखल करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नवीन लाडे यांनी ॲड.नितीन सातपुते यांच्याद्वारे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून, भाजपबरोबर हातमिळवणी करून, सरकार स्थापन केल्यानंतर आधीच्या शिवसेनेच्या नेत्यांची ईडी, सीबीआय, आयकर विभागाने चौकशी थांबविली. याचाच अर्थ, केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या म्हणण्यानुसार वागत आहेत.
आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याचा विचार करून गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठरावीक लोकांनाच लक्ष्य करण्यात येत आहे.
ज्यांच्याविरुद्ध ईडीने आधी कारवाईचा बडगा उगारला, त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाई थंड होते. शिवसेनेचे आधीचे नेते सरनाईक, अडसूळ, जाधव, खोतकर, गवळी यांना ईडीने सातत्याने नोटीस बजावून चौकशीला बोलावून घेतले. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला. मात्र, त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यावर, त्यांच्याविरोधातील चौकशी अचानकपणे थांबली,’ असे याचिकेत म्हटले आहे.