शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासाेबतच्या आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून राजकारण तापले आहे.
अरविंद सावंत, खासदार, शिवसेना -बंडखोरांकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नाही म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा आता आला. त्यातून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली म्हणून डिवचण्यासाठी हे सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ते दुसरा कोणताही आरोप करू शकत नाहीत. कारण ते सृजनशील, सौजन्यशील आणि सज्जन आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे बसले. त्यानंतर त्या माणसाने कोरोनाकाळात फोकस करून नागरिकांचे प्राण वाचविले. तुम्ही त्यांच्यावर टीका करणार. बंडखोरांच्या हाती मुद्दा नाही म्हणून भ्रम निर्माण केले जात आहेत.
हिंदुत्वाच्या मुद्दयांवर भ्रम निर्माण केला जातो आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगला शब्द वापरला तो म्हणजे नवहिंदुत्ववादी. बंडखोरांचा हा हिंदुत्ववाद नाही. कारण हिंदुत्ववादात द्वेष नाही; राष्ट्र आहे. राष्ट्रप्रेम आहे. त्या राष्ट्रामध्ये राष्ट्रातील माणसांबद्दलचे प्रेम आहे. सगळ्यांना एका धाग्यात ओवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणले. हिंदुत्वाचे राजकीय जनक कोण असतील तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी कुणाचा द्वेष नाही सांगितला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरून उद्धव ठाकरे काम करत राहिले. हिंदुत्वाची भूमिका असेल तर ज्या हिंदुत्वाचा नुसता स्वीकार नाही तर ज्यांनी हिंदुत्व अंगीकारले अशा शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे.
अतुल भातखळकर, आमदार, भाजप सध्या शिवसेनेत जे काही चालू आहे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा कसलाच संबंध नाही; पण सध्या शिवसेनेच्या ४२ आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे मतभेद प्रकट केले आहेत. आतापर्यंत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनेची वाटचाल झाली होती; परंतु उद्धव ठाकरे यांनी जनमताचा विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्रिपद मिळविले, तेव्हाच हिंदुत्वासोबत प्रतारणा झाली होती. काँग्रेसच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली जाते.
उद्धव ठाकरे ते सत्तेसाठी सहन करतात. याउलट मणीशंकर अय्यर यांनी अंदमानातील सावरकरांच्या ओळी हटविल्या. तेव्हा त्या वयात बाळासाहेब ठाकरे बाहेर पडले आणि आंदोलनात सामील होत अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले. त्याच्या टोकाचा उलट व्यवहार उद्धव ठाकरे करत आहेत. भाजपने कधीच हिंदुत्वापासून फारकत घेतली नाही. तरीही भाजपलाच उलटसुलट प्रश्न करण्याचेच धोरण राबविले गेले; पण हे करताना स्वत:चा हिंदुत्वाचा वारसा आहे, त्याविरोधात वागतोय, याची तमा त्यांनी बाळगली नाही. एकीकडे शरद पवार आणि काँग्रेस आपली लांगूलचालनवादी धोरणे राबवत असताना उद्धव ठाकरे मात्र हिंदुत्वापासून फारकत घेत असल्याचे जनतेने पाहिले. त्यामुळे परंपरागत हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सामान्य नागरिक दुरावणे सहज दिसत होते.