Vinod Tawde Interview: २०१९ नंतर दिल्लीत जाऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झालेल्या विनोद तावडे यांची महाराष्ट्रात कायम चर्चा होत असते. ते पुन्हा राज्यात परतणार, अशा चर्चाही डोकं वर काढतात. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा होते. पण, विनोद तावडे अद्याप तरी राज्याच्या राजकारणात परतलेले नाहीत. याबद्दलच त्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं आहे.
लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची मुलाखत घेतली.
विनोद तावडे महाराष्ट्रात परत येणार का?
आम्ही एक चर्चा नेहमी ऐकतोय की, विनोद तावडे महाराष्ट्रात येणार. मुख्यमंत्रिपदासाठी एक चांगला चेहरा होऊ शकतो. तुमच्या नावाची सातत्याने चर्चा सुरूये तुम्ही दिल्लीत गेल्यापासून? असं विनोद तावडे यांना विचारण्यात आले.
उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले, "मी स्पष्ट केलंय की, ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र. मला देश पातळीवर काम करताना जो आनंद मिळतोय. २० वर्ष आमदार. मंत्रिपद इतकं सगळं झाल्यावर आता आपलं राज्यातील राजकारण संपलं. आता राष्ट्रीय स्तरावर करतो."
समजा पक्षाने सांगितलंच, तर? असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "मला पक्षाने विचारलं होतं, तुला विधासभा लढवायची आहे का? मी नाही म्हटलं. मला देश पातळीवर काम करायचं, हे मी स्पष्ट केलं."
आम्ही काय संन्यास घ्यायचा? तावडेंचा प्रश्न
तुम्हाला असं वाटत नाही का, की तुम्ही एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. शिवसेनेमध्ये फूट पडली. भावा-भावात फूट पडली. घराघरात फूट पडली. या सगळ्याचा परिणाम आता विधानसभेच्या उमेदवाऱ्यांमध्ये आई आणि वडील एकमेकांविरोधात, काका-पुतण्या, भाऊ विरुद्ध भाऊ, असा महाराष्ट्र भाजपला हवा होता का? असा प्रश्नही तावडेंना विचारण्यात आला.
त्यावर तावडे म्हणाले, "असा अजिबात नको होता. पण, याला जबाबदार एक माणूस आहे, २०१९ ला गद्दारी करणारे शिवसेनेचे उद्धव ठाकरेंमुळे घडलं."
त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं? या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले, "मग आम्ही काय संन्यास घ्यायचा? असं होऊ शकत नाही. आम्ही जर प्रामाणिकपणे जनादेश पाळून चाललो होतो, त्यात कुणी गद्दारी केली... हा त्याने केली गद्दारी जाऊ द्या. असं नाही. आम्ही राजकारणात आहोत. ते सत्तेतून महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी आहोत. विरोधी पक्षात बसून प्रगती करायला नाही", असे उत्तर विनोद तावडे यांनी दिले.