लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी मोदी सरकारने निवडलेल्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राम मंदिराची उभारणी होत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही. वातावरण निवळल्यावर मुहूर्त घेतला असता तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला असता. नेमकी हीच वेळ का निवडली हे कळत नाही, असे ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमिपूजनावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमीपूजन करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी असहमती दाखवली. मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे. या मंदिरासाठी असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. हा ऐतिहासिक सोहळा धुमधडाक्यातच व्हायला हवा. ई-भूमीपूजन वगैरे होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे जल्लोषात भूमीपूजन व्हायला हवे, असे मत राज यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यानंतरही भूमिपूजन करता आले असते. जगण्याची हमी आली असती तर लोकांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला असता, असेही राज म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीकामुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. हे सरकार आले तेव्हाच मी म्हणालो होतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही, असे ते म्हणाले.