'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द का केला नाही?' काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 03:37 PM2023-10-20T15:37:06+5:302023-10-20T15:37:47+5:30

Nana Patole Criticize Devendra Fadnavis : निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली. पण ते करतानाही देवेंद्र फडणवीसांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले.

'Why didn't Devendra Fadnavis cancel the contract recruitment GR when he was chief minister for five years?' Congress question | 'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द का केला नाही?' काँग्रेसचा सवाल

'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द का केला नाही?' काँग्रेसचा सवाल

मुंबई -  सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली. पण ते करतानाही देवेंद्र फडणवीसांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले, अशी प्रतिक्रिया  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

यासंदर्भात भाजपा सरकार व देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय काँग्रेस सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत पण ही नोकर भरती सरकारच करत होते व त्यांना नंतर सेवेत कायम केले जात होते. सध्याची नोकरी भरती मात्र खाजगी कंपनीकडून केली जात होती. सर्वात महत्वाचे म्हणजे २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते मग त्यांनी काँग्रेस सरकारचा कंत्राटी नोकर भरतीचा जीआर त्याचवेळी रद्द का केला नाही? आताही शिंदे सरकार येऊन दीड वर्ष झाली, या दीड वर्षात हा जीआर रद्द का केला नाही? शिंदे सरकार सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांना तातडीने स्थगिती देऊ शकता तर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्यास एवढा वेळ का लागावा? याची उत्तरे देवेंद्र फडणवीस यांनी द्यायली हवीत, पण फडणवीस यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली असून मी खरे कधी बोलत नाही आणि खोटे मला बोलता येत नाही ही फडणवीसांची कार्यपद्धती आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढला होता त्यावेळी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर होते, तसेच फडणवीस सरकार असताना व मविआ सरकारमध्येही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मंत्री होते. फडणवीस यांनी शिंदे पवार यांच्यावर कंत्राटी नोकर भरतीचे खापर फोडायचे आहे असे दिसते. शिंदे व पवार यांना फडणवीस यांनी उघडे पाडले याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. काँग्रेस पक्षाने कंत्राटी नोकर भरती प्रश्नी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज्यपाल महोदयांनी ही खासगी एजन्सीमार्फत होणा-या कंत्राटी भरती संदर्भात आपण लक्ष घालून असे आश्वासन दिले होते. काँग्रेस पक्षाचा विरोध व राज्यभरातील लाखो तरुणांचा रेटा यापुढे भाजपा सरकारला अखेर झुकावेच लागले, असे पटोले म्हणाले.

Web Title: 'Why didn't Devendra Fadnavis cancel the contract recruitment GR when he was chief minister for five years?' Congress question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.