ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २० - उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेत विचारला. सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवर कुरघोडी राजकारण सुरुच आहे.
जळगावमध्ये झालेल्या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वाती पिटलेच्या आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टिका केली. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत ही शरमेची बाब आहे असल्याचे ते म्हणाले.
स्मार्ट सिटीवरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. स्मार्ट सिटी बनवण्यापेक्षा लोकांचे पाण्याचे प्रश्न सोडवा असा टोला भाजपला लगावला. शिवसेना जे बोलते ते करुन दाखवते. स्वाती पिटलेच्या आत्महत्येनंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आदेश काढले आणि ४ लाख ६० विद्यार्थ्यांच प्रवास शुल्क माफ झाले याचे समाधान असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
आधी विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते. आता मराठवाडयातील शेतकरी आत्महत्या करत आहे. उत्तर महाराष्ट्रही त्याच दिशेने चालला आहे. शेतक-याचं जीवन सुखी, समृध्द करणं हेच शिवसेनेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.