Manoj Jarange Patil ( Marathi News ) : "मनोज जरांगे पाटील यांना दिवसातून तीन वेळा मीच दिसतो. मात्र मी त्यांना यापूर्वीच आवाहन केलंय की तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं लिहून घ्या. लिहून नाही घेता आलं तर किमान तोंडी तरी भूमिका जाहीर करायला लावा," असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना कोंडीत पकडलं. फडणवीसांच्या या टीकेवर आता मनोज जरांगे यांनीही पलटवार केला आहे.
"मी नेहमी सांगतो की देवेंद्र फडणवीस हे काही माझे शत्रू नाही. परंतु तुम्ही आरक्षणाबाबत निर्णय घ्या, असं आम्ही त्यांना १४ महिन्यांपासून सांगत आहोत. तरीही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मी तुमचं नाव घेतो, कारण तुमच्यासारखा विश्वासघातकी माणूस या इतिहासात कधी घडला नाही, या भूमीवर देखील कधी आला नसेल इतका विश्वासघाती हा माणूस आहे," असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केला आहे.
दरम्यान, "तुम्हीच वाटोळं केलं, म्हणून मी तुमचंच नाव घेणार. ओबीसींमध्ये इतर काही जातींचा नुकताच समावेश करण्यात आला. पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही. दीड-दीड हजार रुपये तुम्ही मतदानाच्या नावाखाली लोकांना वाटता, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवत नाहीत, अंगणवाडी सेविका, शिक्षकांचा प्रश्न तसाच पडलेला आहे, तुम्ही प्रश्न सोडवतात तरी नक्की कोणते?" असा खरमरीत सवालही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.