मुंबई - जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना, युवकांना, जनतेला फसवले आहे. म्हणून या सरकारचा उल्लेख आम्ही ठग ऑफ महाराष्ट्र असा केला आहे, अशी बोचरी टीका विरोधकांनी राज्य करकारवर केली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला घेरण्यासाठी रणनीती बनवण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना विरोधी पक्ष नेते रधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. "राज्यात दुष्काळाची घोषणा होऊन 21 दिवस झाले, पण सरकारकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्री दुष्काळापेक्षा आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यातच धन्यता मानत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रतिहेक्टर आणि फळबागांना एक लाख रुपये प्रतिहेक्टर मदत द्या, अन्यथा कामकाज चालू देणार नाही'', अशी घोषणाही विखे-पाटील यांनी केली. या सरकारने शेतकऱ्यांना, युवकांना, जनतेला फसवले आहे. म्हणून या सरकारचा उल्लेख आम्ही ठग ऑफ महाराष्ट्र असा केला आहेत, असेही विखे-पाटील म्हणाले. तसेच भाजपा आणि शिवसेनेला आता वनवासात जाण्याची वेळ आली म्हणून त्यांना राम आठवत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला 1 डिसेंबर चा मुहूर्त कशाला ? उद्याच अहवाल ठेवा आणि आरक्षण द्या, तसेच धनगर आरक्षणाबाबत टीस चा अहवाल पटलावर ठेवा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत भूमीका जाहीर करा, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली. तर राज्यात दुष्काळासह अनेक महत्वाचे प्रश्न असताना सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून पळपुटेपणा केला आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला घेरण्यासाठी रणनीती बनवण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावित, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 5:00 PM