मुंबई, दि. 5 - ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले लाडके गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतणार आहेत. गणपतीबाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्याच दिवशी का करतात याबाबत माहिती दिली आहे खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी.
आज मंगळवार, ५ सप्टेंबर, अनंत चतुर्दशी! आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे. तरीही आज संपूर्ण दिवस गणेशमूर्तींचे विसर्जन करायला हरकत नाही. अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. पण मग अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? याचे कारण असे की, कधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी अपराण्हकाळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असेल तर त्याच दिवशी महालयारंभ व प्रतिपदा श्राद्ध असते. महालयारंभापासून पितृपक्ष सुरू होतो. याच वर्षी उद्या बुधवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महालयारंभ आलेला आहे. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून अनंत चतुर्दशी हा ठरविलेला आहे.
त्यामुळे आज गणेशमूर्तींचे विसर्जन होते आहे. या वर्षी दशमी तिथीची वृद्धी (म्हणजे दशमी तिथी दोन दिवस सूर्योदयाला) झाल्यामुळे बाराव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. आज मंगळवार असला तरी गणेशमूर्तींचे विसर्जन करावयाचे आहे. कारण मंगळवारचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. गणेशोत्सवाचे हे दिवस खूप आनंदात जात असतात. गणपतीचे आणि आपले एक जिव्हाळ्याचे नाते तयार होते. गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यावर घर काय किंवा मंडप काय ओकाओका वाटू लागतो. गणेशोत्सवाचे हे दिवस संपूच नयेत असे सर्वांना वाटत असते. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी भक्तांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडतात की ‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!’
आज सर्व जण शेवटच्या आरतीच्या वेळी एकत्र येतात, परंतु उत्साह नसतो. कारण आज बाप्पाला निरोप द्यायचा असतो. वातावरण गंभीर असते. प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून मूर्तीमध्ये देवत्व आणलेले असते, मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजेनंतर मंत्र म्हणून ते देवत्व काढून घ्यायचे असते. आरतीनंतर घरातील सर्व मंडळी आपापल्या मनात श्रीगणेशाची प्रार्थना करीत असतात. खरं म्हटलं तर जे आपण गणेशाकडे मागत असतो ते मिळविणे आपल्याच हाती असते. म्हणूनच स्वत:च्या प्रगतीसाठी आपणच प्रयत्न करावयास हवेत.
घरातील सर्वांनी प्रार्थना करून झाल्यावर गणेशाने लवकर पुन्हा येण्यासाठी त्याच्या हातावर दही घातले जाते. आणि नमस्कार करून मंत्र म्हटले जातात...‘यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवम्।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनायच ।।आवाहितदेवतां विसर्जयामि ।।'नंतर मूर्ती विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होतो. सर्व जण आपल्या आवडत्या बाप्पाच्या नावाचा जयघोष करीत असतात आणि बाप्पाला विनंती करीत असतात...‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!’- दा. कृ. सोमण,पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक