मुंबई - राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. स्थानिक पातळीवर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 5 नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देऊन शिवसेनेला शह दिला. त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने कल्याणमध्येराष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली. आता, या अंतर्गत सत्तासंघर्षावर मनसेनं टीका केलीय. मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधलंय. राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याआधी पारनेरमध्ये या दोन पक्षांनी सत्तेचं गणित जमवलं होतं. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अलीकडेच जामखेडमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या ताफ्यात घेतलं. त्या पाठोपाठ, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिलेदारांच्या हातावरच घड्याळ बांधलंय. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी हा धक्का ठरू शकतो. मात्र त्यामुळे आता नगरपंचायतीत शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक उरलेत. तर दुसरीकडे शिवसेनेनं राष्ट्रवादीला धोबीपछाड दिलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती समजते. त्यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवली असून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला अशी चर्चा आहे. यावरुन, मनसेनं शिवसेना-राष्ट्रवादीला टोला लगावलाय.
तिकडे अजित पवारांनी नगरसेवक फाेडले..मग यांनी बदल्या रद्द करुन धाेबीपछाड दिला. सरकार चालवत आहात की WWF सुरु आहे यांच्यात. इतरांना सांगायचे राजकारण नको आणि हे एकमेकांना पाण्यात बघायची एकही संधी सोडत नाही आहेत.. बिनडोक सरकार.. असे म्हणत गजानन काळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलंय.
दरम्यान, कल्याण पंचायत समितीत भाजपाच्या ५ सदस्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांची सभापती म्हणून निवड झाली. त्यांना सात मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना ५ मते मिळाली. उपसभापती शिवसेनेचे रमेश बांगर विजयी झाले. त्यांनाही ७ मते मिळाली. तर याठिकाणीही राष्ट्रवादीच्या भरत भोईर यांचा पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या कुरघोडीवरुन मनसेने शिवसेनेला चांगलाच टोला लगावलाय. नवी मुंबईतील मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सरकारला बिनडोक असं म्हटलंय.