राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याच्या महापुरुषांचा अपमान केला होता, यावरून विरोधकांनी महाराष्ट्रभर बंदची हाक देत राज्यपालांना हटविण्याची मागणी केली होती. आता महिनाभरानंतर राज्यपालांनी निवृत्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद मोदींकडे व्यक्त केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी वेगळेच संशय व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती, यापूर्वीच त्यांनी पदमुक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा अपमान केला, महापुरुषांचा अपमान केला. त्यांना आता उशिरा सुचलेले शहाणपण आहे. मोदी जेव्हा मुंबईला आले होते तेव्हाचे राज्यपालांचे जे वागणे होते ते सुद्धा लोकांना जाणवले आहे, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली.
याचबरोबर १७-१८ तारखेला हे सरकार कोसळले तर, खंडपीठाने निर्णय दिला, हे सरकार कोसळले तर त्यापूर्वीच आपला काढता पाय घ्यावा असे कोश्यारी यांना वाटत असावे. लवकर गेले पाहिजेत. आज अनेक महापुरुषांची जयंती आहे. त्यांनी लवकर महाराष्ट्र सोडावा आणि महाराष्ट्राला मोकळे करावे, असे मिटकरी म्हणाले.
जर कायदेशीर प्रक्रिया पाहिली तर ज्यावेळी राज्यपालांना पदउतार व्हायचे असते तेव्हा त्यांनी राजीनामा राष्ट्रपतींना द्यावा लागतो. इथे त्यांनी पंतप्रधानांनाच तोंडी शिफारस केलीय. याचा अर्थ राष्ट्रपतींचा कारभार सुद्धा मोदी चालवतात का असा प्रश्न उरतो. इथे त्यांनी मोदींना बोलून संभ्रमात टाकले आहे. माझी तर जायची इच्छा आहे बुवा पण नरेंद्र मोदींच्या मनात आल्याशिवाय जाऊ शकत नाही, असेही त्यांनी महाराष्ट्राला दाखविल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.