अजित पवारांना आतापासूनच साईडलाईन का केलं जातंय? अनिल देशमुखांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:32 AM2023-11-29T09:32:05+5:302023-11-29T09:38:30+5:30
Anil Deshmukh : युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
अकोला : राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचं सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवारांना साईडलाईन केले जाईल, हे सर्वांना माहीत आहे. पण, ते आतापासूनच अजित पवारांना साईडलाईन का केलं जातंय? याचा पेच आम्हालाही पडला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर टीका केली. आमचे सहकारी सरकारमध्ये गेले, हे प्रेमापोटी नाही गेले. ज्याप्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये, म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच, जेलमध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूनच तिकडे गेले, अशी मिष्किल टीकाही अनिल देशमुख यांनी केली.
याचबरोबर, जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो. आपल्यालाही मंत्री पद मिळाले असते, असा दावा सुद्धा अनिल देशमुख यांनी केला. तसेच, सध्या शेतीसह अन्य ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी महायुतीच्या सरकारकडे वेळ नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न राज्यात आहेत. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी केली आहे. याशिवाय, अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देऊन कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये आणि सोयाबीनला ८ हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज - अनिल देशमुख
जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच, अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनदरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, असा अमानुष लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.