सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या परिस्थितीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या बोलण्यासारखं काही नसेल म्हणून ते काही बोलत नसतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर ते बोलत होते.
ज्या गावी जायचंच नाही त्या गावचा पत्ता विचारू नये, असंही ते जर भाजप सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण असेल या प्रश्नाला उत्तर देतना म्हणाले. सध्या आमच्याकडे कोणताही विषय आलेला नाही. जेव्हा असं काही येईल तेव्हा पाहू. सध्या सगळं हवेतलंच आहे, असंही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या महाशक्ती पाठीशी असलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं. ते कोणती महाशक्ती आणि कोणता राष्ट्रीय पक्ष म्हणत आहेत हे त्यांनाच माहित, असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
संजय राऊत काय म्हणतात याचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआय स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे त्यावर टिपण्णी करणं योग्य नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सध्या शिवसेनेच्या अनेक बैठका सुरू आहेत. यावर बोलताना तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं ते म्हणाले. आम्ही त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा शिवसेनेच्या दोन गटांचा विषय आहे. यात भाजपनं काही करण्याचा प्रश्न नाही. आमच्याकडे आमचं काम आहे. हा शिवसेनेच्या दोन गटांचा प्रश्न आहे आम्हा यात काही करण्याचं काम नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.