मुंबई : केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही खोट्या आरोपांनी आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. एनसीबीने माझ्या नवऱ्याला अटक केली होती. आता, ईडीने माझ्या वडिलांविरोधात कारवाई केली आहे. पण, याविरोधात आम्ही लढत राहू, असे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले. तसेच, प्रत्येक मुसलमानाचा अंडरवर्ल्ड, दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न का होतो? असा सवालही त्यांनी केला.
मलिक यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक- खान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ईडी आणि भाजपवर टीका केली. हे संपूर्ण प्रकरण बनाव करत वेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न असल्याचा आरोप निलोफर यांनी केला.
"आम्ही जमीन घेतली; पण ज्या पद्धतीने यंत्रणा सांगत आहेत, तशी नाही. नवाब मलिकांना समन्स न देताच ईडीचे लोक त्यांना घेऊन गेले. ईडीचे अधिकारी सर्च वॉरंट घेऊन आमच्या घरी आले. ते केंद्राच्या विरोधात लढत होते, त्यामुळे त्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने नेण्यात आले," असेही त्या म्हणाल्या. "तर असे राजकारण या महाराष्ट्राने कधी बघितले नव्हते. ५५ लाखांच्या व्यवहारासाठी ईडी लागत असेल, तर यापुढे १० रुपये खिशात ठेवताना, १० रुपयाच्या गोळ्या घेतानाही विचार करायला पाहिजे की याचीही ईडी चौकशी होऊ शकते," असा टोलादेखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
‘ते महसूलमंत्री कधीही नव्हते’ ईडीने रिमांड कॉपीत मलिक हे राज्याचे महसूल मंत्री होते, असा दावा केला आहे. अशा प्रकारच्या खोट्या आरोपांनीच मलिक परिवाराला लक्ष्य केले जात असल्याचे निलोफर म्हणाल्या. नवाब मलिक पाचवेळा मंत्री होते. पण ते महसूल मंत्री कधीच नव्हते. जो माणूस त्या पदावरच नव्हता, त्याला त्या पदावर दाखवण्याची चूक एवढी मोठी तपास यंत्रणा करते, हे खेदजनक आहे.