विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. यातच, एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.
राणे म्हणाले, "अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही -अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही. अस्तित्वात नाही. ही मराराष्ट्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली आहे. अडीच वर्षात कोणत्याही स्वरुपाचा विकास नाही. सुडाच्या भावणेतून कारवाया करायच्या, विरोधकांना अपशब्द बोलायचे, मुख्यमंत्री पदाचा जो मान होता, जी शान होती तीही घालवली. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते. असेच म्हणावे लागेल. आता यानंतर महाराष्ट्रात काय घडते ते आपण बघुया, असेही राणे म्हणाले.
राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते - संजय राऊतांबद्दल बोलताना राणे म्हणाले, “संजय राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते. आता आवाज बसलाय, खाली गेलाय. उद्यापर्यंत तो आवाज बंद होईल. ते काहीही बोलतात. काय किडनॅपस ते वावरताना दिसत आहेत आणि शिवसेनेला कोणीही घाबरत नाही,” असंही राणे म्हणाले.