रोहित नाईक, उप-मुख्य उपसंपादकदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी नेमबाजांनी गाजवली. त्यातही स्वप्नील कुसाळेच्या शानदार कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली. असे असले तरी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राकडून स्वप्नीलसह प्रवीण जाधव (तिरंदाजी), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स) आणि सर्वेश कुशारे (ॲथलेटिक्स) हे पाच खेळाडूच सहभाग झाले आहेत. राज्यातील केवळ पाच खेळाडूच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. त्याचवेळी, हरयाणा (१८), पंजाब (१८), तामिळनाडू (१३) आणि राजस्थान (८) या राज्यांनी मात्र देशात बाजी मारली आहे. देशातील सर्वांत प्रगत राज्य, सर्वाधिक कर देणारे, सर्वाधिक गुंतवणूक होणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. तरीही महाराष्ट्रातून केवळ पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असल्याने नेमके आपण कुठे मागे पडलो, असा प्रश्न आहे.
मुळात खेळांना विशेष प्राधान्य मिळत नाही आणि हीच मोठी खंत आहे. आज सर्वांत जास्त प्राधान्य करमणुकीला मिळत आहे. त्यानंतर शिक्षण, नोकरी, आरोग्य अशा गोष्टी येतात; पण खेळाचा क्रम खूप मागे लागतो. मुंबईत जागांची वानवा आहेच; पण राज्यातील अनेक भागांत असलेल्या खुल्या मैदानांचाही खेळांसाठी पूर्ण वापर होताना दिसत नाही. अशा मैदानांवर ‘सरकारी परवानगी’ घेऊनच सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम होतात; तसेच पावसाळी वातावरणात मैदाने जवळपास बंदच राहतात. पाऊस ओसरल्यानंतर मात्र येथे सण-उत्सवांचे कार्यक्रम होतात; तसेच बहुतांश मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून होत आहे. त्यामुळे लोकांचे प्राधान्य बदलत चालले आहेत, मुळात हे आधी बदलले पाहिजे.
बाहेरच्या देशांत दोन व्यक्ती भेटल्यावर त्यांच्यात खेळांची चर्चा रंगते. आपल्याकडे मात्र राजकीय, फिल्मी आणि आर्थिक चर्चा रंगतात. यावरून आपल्याकडे क्रीडा संस्कृती किती पिछाडीवर आहे, हे दिसून येते. कित्येक वर्षांपासून नाही, तर कित्येक दशकांपासून म्हटले जाते की, सोयीसुविधांचा अभाव आहे; पण आज सरकारच्या वतीने अनेक उपक्रम सुरू झाल्यानंतरही नागरिक त्याचा वापर किंवा फायदा करून घेत नाहीत. मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक उड्डाणपुलाखाली खेळाचे कोर्ट, मैदाने तयार करण्यात आली आहेत; पण त्याचा पूर्णपणे वापर नागरिकांकडून होत नाही. ज्यांचा खेळाकडील दृष्टिकोन खंबीर आणि गंभीर आहे त्यांना या अडचणींवर चांगल्याप्रकारे मात करता येईल.क्रीडा विद्यापीठासाठी जागा मिळेना!दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली. गेल्यावर्षी यासाठी अभ्यासक्रम ठरवून हे विद्यापीठ सुरूही होणार होते; मात्र राज्य क्रीडा विभागातील एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या क्रीडा विद्यापीठासाठी जागेचा शोध सुरू आहे.