अतुल भातखळकर, भाजप आमदारळात सावरकरांच्या तथाकथित पत्रांचा, माफीचा उल्लेख २००३ पासून चालू झाला. त्याचे कारण असे आहे की, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या दृष्टीने देशभरात प्रतिष्ठा मिळायला लागली. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे तैलचित्र संसदेच्या सभागृहात लागले. तेव्हापासून या डाव्या इतिहासकारांनी जे ‘सो कॉल्ड लेफ्ट लिबरल’, आहेत त्यात पहिले नाव घ्यावे लागेल ए. जी. नुरानी यांचे. त्यावेळी काही लेख लिहिले, मग हे सावरकरांचे तथाकथित माफीपत्र त्यांनी त्या लेखांमधून मांडले. त्यामुळे याचे मूलभूत कारण हे आहे की, हिंदुत्वाचा आणि सावरकरांचा वैचारिक विजय होत आहे आणि राजकीयदृष्ट्या त्यांचे विचार समाजाने स्वीकारलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि पर्यायाने या विचारांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. २००४ मध्ये विधान परिषदेचे सभापती ना. स. फरांदे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांचे तैलचित्र लागले. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसने त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. २००२ पासून या सगळ्या गोष्टी काँग्रेसने चालू केल्या. मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील ज्योतीवरील सावरकरांच्या पंक्ती काढल्या. जसा प्रभाव वाढत चालला, तसा हा प्रयत्न वाढत गेला.
सचिन सावंत, काँग्रेस नेतेदेशातील वैचारिक संघर्ष आहे. एका ठिकाणी गांधीजींचा विचार आहे, दुसरीकडे सावरकर-गोळवलकरांचा विचार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार त्या विचारांनी देश पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. गांधीजींनी दिलेल्या विचारांनी हा देश चालला, आता मार्ग बदलायचा प्रयत्न होतोय. त्यामुळे हा विषय येणे साहजिकच आहे. देशात मने दुभंगवण्याचे काम करणाऱ्यांना विरोध करण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे. त्यामुळे त्यांचे जे आदर्श आहेत त्यांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणणे हेदेखील गरजेचे ठरते. पंडित नेहरूंबद्दल आता भाजप जे पसरवते आहे ती अतिशयोक्ती आहे. अनेक जणांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांनी अशा पद्धतीने माफीनामे लिहिले नव्हते. सावरकरांना गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रविरोधी हिंदू आवृत्ती आणि सावरकरांचे हिंदुत्व प्रतिक्रियात्मक, नकारात्मक हिंदुत्व आहे, म्हटले होते. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या संघाला दिली, तिलाच नाकारण्याचे काम गोळवलकरांनी केले होते. त्याचा निषेध भाजप कधी करणार ते सांगावे. दुसरीकडे सावकरांबद्दल इतकी आत्मीयता आहे, तर त्यांच्या विचारांवर भाजप का चालत नाही. गोहत्याबंदीचा कायदा हा सावरकरांच्या विचारांच्या विरोधातला आहे. सावरकरांच्या विचारात वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्याचाही अवलंब भाजपने करावा.