बारामती - Sharad Pawar on Ram Mandir ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपात आता शरद पवारांनीराम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याबाबत विधान केले आहे. तुम्ही रामाचं सगळं करता, पण तिथे सीतेची मूर्ती का नाही अशी नाराजी महिलांची असल्याचं शरद पवारांनी सांगितले. राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला, त्यावर ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, राम मंदिर होऊन गेले, आता लोक चर्चाही करत नाहीत. अजिबात चर्चा होत नाही. एका बैठकीत माझ्यासमोर हा विषय निघाला. तुम्ही रामाचं सगळं करताय, सीतेची मूर्ती का बसवली नाही अशी तक्रार महिलांनी केली. मी महाराष्ट्रात फिरतोय, मला अनुकूल चित्र दिसतंय. लोकांमध्ये सरकारविषयी नाराजी आहे. घोषणा खूप झाल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. देशाचं चित्र सध्या सांगता येणार नाही. पण लोकांशी बोलल्यावर सरकारबद्दल अजिबात आस्था नाही असं दिसतं असंही त्यांनी सांगितले.
तसेच कांद्याचा प्रश्न आहे. यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झालं, परंतु निर्यातीचा प्रश्न समोर उभा आहे. शेतीमाल बाहेर जावा, शेतकऱ्यांच्या पदरात २ पैसे अधिक यावेत याला या सरकारचा सक्त विरोध आहे. शेतकरी दुखी असल्याने त्याचा परिणाम नक्की होतो. शेतकऱ्यांना वर्षातून एकदा ६ हजार द्यायचे, त्यानंतर खतांचे भाव वाढवले, औषधे महागली, मजुरी वाढली. तयार झालेल्या मालाला गिऱ्हाईक नाही. निर्यात करायला परवानगी नाही. ६ हजार द्यायचे आणि त्याच्या दुप्पट काढून घ्यायचे हा राग शेतकऱ्यांमध्ये आहे असंही शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, जे सध्या टीका करतायेत, त्यांच्या विश्वासावर मी सगळं सोपवलं होतं. त्या विश्वासाला तडा त्यांनी दिला. त्यामुळे साहजिकच मला लक्ष द्यावं लागले. पाणी आणि चारा हा पुरंदर, बारामतीत दुष्काळाचा प्रश्न आहे. आजचं सरकार पाहिजे ते लक्ष देत नाही. लोकांना मदत करावीच लागेल असं शरद पवारांनी म्हटलं आहे.