आजचे राज्यकर्ते विरोधक होते तेव्हा मराठवाड्याच्या विकासावरून रान उठवले जायचे... आज तेच काम कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक करत आहे. गोदावरीचे अर्धे खोरे, जायकवाडीसारखे मोठे प्रकल्प उशाशी असताना वर्षांतील दहा महिने मराठवाड्याचा घसा कोरडाच राहातो. कधीकाळी सुजलाम असलेला हा प्रदेश आणि ऊसतोड कामगार आणि स्थलांतरीत मजुरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कृष्णा खोऱ्यातील ३१ टीएमसी पाणी मिळणार या आशेवर दोन पिढ्या जगल्या, पण पाणी आलेच नाही. जलयुक्त शिवारच्या नावाखाली नद्यांची पात्रे रुंदावून पावसाळ्यात ती काठोकाठ भरली की सरकार त्याची जाहिरात करणार. पण पावसाळा संपताच ती नदी आणि ते शिवार पुन्हा कोरडेठाक! लोकांना पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा, बेरोजगारांच्या हाताला काम हवंय आणि नेते राष्टÑवादाचा ठोस पाजून जाताहेत. मराठवाड्यातील जनतेलाही आता याची सवय झाली आहे. त्यामुळे ‘मराठवाड्याचा टँकरवाडा का झाला?’ या प्रश्नाचे उत्तर कुणीच देत नाही.
मराठवाड्यात काँग्रेसच्या मतबँकेला १९७७ पासून हादरेशिवसेनेचा औरंगाबादमध्ये उदय ही एका अर्थाने मराठवाड्याचे पारंपरिक राजकारण बदलण्याचा महत्त्वाचा टप्पा होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर मराठवाडा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला आणि काँग्रेस संस्कृती रुजली. कारण त्यावेळी निजामाच्या जोखडातून मुक्त होण्याचाच आनंद एवढा मोठा होता की, राजकीय जाणिवा त्यापुढे फिक्या पडल्या आणि काँग्रेस बळकट झाली. मुक्तिसंग्रामातील आघाडीचे नेते गोविंदभाई श्रॉफ हे समाजवादी पक्षाकडून उभे राहिले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. रफिक झकेरिया होते. झकेरिया हे मुंबईचे आणि मुक्ती आंदोलनात आयुष्य घातलेले गोविंदभाई; पण या लढतीत झकेरिया जिंकले. यावरूनच लक्षात येते की, काँग्रेसची पाळेमुळे मराठवाड्यात घट्ट होती. नाही म्हणायला उस्मानाबादेत शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटलांचा अपवाद होता.
१९७७मध्ये आणीबाणीनंतर जालन्यात जनता पक्षाचे पुंडलिकराव दानवे यांनी काँग्रेसचे माणिकराव पालोदकर यांना पराभूत केले होते. याचवेळी बीडमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गंगाधर अप्पा बुरांडे हे विजयी झाले होते. एका अर्थाने १९७७ पासून काँग्रेसच्या मतबँकेला हादरे बसायला प्रारंभ झाला होता.जनसंघाचे रामभाऊ गावंडेही होते; पण हे सगळे उदाहरणापुरते. सत्ता काँग्रेसकडेच होती. पुढे शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केली. त्यावेळी औरंगाबादेतून साहेबराव पाटील डोणगावकर हे खासदार झाले होते; परंतु हे सगळेच काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले होते.पुढे शरद पवारांची समाजवादी काँग्रेस राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबादेतच काँग्रेसमध्ये विलीन झाली. शंकरराव चव्हाणांच्या रूपाने पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे आले. पुढे ते अल्पकाळ शिवाजीराव पाटील निलंगेकरांनाही मिळाले होते. साखर कारखाना, महाविद्यालय, जिल्हा बँक, भूविकास बँक, सहकारी सोसायट्या हा काँग्रेसच्या राजकारणाचा राजकीय आधार होता आणि सत्तेचे मॉडेल म्हणून प्रत्येक जिल्ह्यात असे मॉडेल तयार झाले होते. सत्ता केंद्र कुटुंबापुरते मर्यादित झाले होते. शेवटी प्रस्थापितांविरोधी जनमानस तयार होण्यास अनेक कारणे निर्माण होतात.
याच काळात औरंगाबाद शहरातील जातीय तणाव आणि अस्वस्थतेचा फायदा शिवसेनेने उठवला आणि ८० च्या दशकात सेनेचा उदय झाला. औरंगाबाद महापालिकेत सत्ता मिळविल्यानंतर औरंगाबाद ते नांदेड या रेल्वेपट्ट्यात सेनेचा वेगाने विस्तार झाला आणि मराठवाड्याच्या राजकारणाचा पोत बदलला. छोट्या, दुर्लक्षित समाजाला सत्तेचा स्पर्श झाला. त्यांच्या राजकीय जाणिवा तयार व्हायला प्रारंभ झाला. अनेक तरुण राजकारणात आले. तशीही तरुणाच्या राजकारण प्रवेशाची प्रक्रिया १९७२ च्या मराठवाडा विकास आंदोलनातून झाली होतीच. या आंदोलनानंतर युवक क्रांती दल, युवक बिरादरी, अ.भा.वि.प. यासारख्या संघटनांनी तरुणांमध्ये विचारमंथन सुरू केले होते. पुढे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाने राजकीय प्रबोधन झाले आणि राजकीय जाणिवा विकसित झाल्या. पुढे शिवसेनेच्या उदयानंतर ही डावीकडे झुकणारी समाजवादी चळवळ बाजूला पडली. बाबरी मशीद घटनेनंतर हे राजकारण उजव्या विचारसरणीकडे जास्तच झुकले. सेनेने मराठवाडा व्यापला आणि त्याचवेळी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांनी भाजपचे जाळे विणले. पुढे या दोन पक्षांच्या युतीने राजकारणाचा पोत बदलला. शिवसेना थोरली व भाजप धाकटी पाती, अशा नात्याने १९९५ च्या निवडणुकीत युती सत्तेवर आली आणि काँग्रेसची एकछत्री सद्दी संपली. पुढचे सगळे राजकारण याच दिशेने चालत राहिले. आज यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
जालन्यात शिवसेनेची भूमिका महत्त्वाचीजालना मतदारसंघात सलग पाचव्यांदा भाजपाकडून खा. रावसाहेब दानवे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा विलास औताडे यांना रिंगणात उतरवले आहे. दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बेबनाव होता. परंतु, आता हा वाद मिटला आहे. आता शिवसेनेकडून नेमका युतीचा धर्म किती पाळला जातो, यावर दानवेंचे भविष्य अवलंबून आहे. यासह काँग्रेस व राष्ट्रवादीकडून किती प्रभाविपणे दानवेंचा विरोध केला जातो. याकडे लक्ष आहे.हिंगोलीत अटीतटीचीहिंगोलीत १९९६पासून आलटून-पालटून राष्ट्रवादी व शिवसेनेकडे मतदारांचा कल राहिला आहे. मागच्या वेळी या मतदारसंघात काँग्रेसकडून खा. राजीव सातव यांना मैदानात उतरविले होते. त्यांनी मोदी लाट असतानाही सेनेकडून ही जागा खेचली. मात्र या वेळी ते स्वत: रिंगणात नाहीत. मागच्या वेळी शिवसेनेकडून लढलेले सुभाष वानखेडे यावेळी काँग्रेसकडून लढत असून सेनेने नांदेडचे आ. हेमंत पाटील यांना मैदानात उतरविले आहे. वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड किती मतं घेतात, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
परभणीत गड राखण्याचे आव्हान३५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र येऊन शक्ती उभी केल्याने शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकीत उडी घेतल्याने चुरस वाढली आहे. यावेळी युतीकडून शिवसेनेचे खा. संजय ऊर्फ बंडू जाधव रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजुने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीकडून राकाँचे राजेश विटेकर निवडणूक रिंगणात आहेत.
लढत प्रतिष्ठेचीकाँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्ये १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे़ लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात आहे़ काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.
बीड : भाजपचे वर्चस्वबीडमध्ये २००४चा अपवाद वगळला तर गेल्या पाच निवडणुकांत भाजपने चार वेळा दणदणीत विजय मिळविला आहे. पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे सात लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. आता भाजपच्या प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, बहुजन वंचित आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात आहेत.
पुन्हा राणा-ओमउस्मानाबादची लढत लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील व शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर आमने-सामने आहेत. मोदींभोवती फिरणारी उस्मानाबादची लढाई कर्जमाफी, शेतकरी व बेरोजगारीवर थांबत आहे. दोन कुटुंबातील वादाची किनारही प्रचाराला आहे. दोन्ही बाजूंनी आक्रमक दिसणारा प्रचार लक्षात घेता लढाई टोकाची होणार आहे.
लातूरमध्ये कॉँटे की टक्करलातुरात २०१४ ची जागा अडीच लाखांच्या फरकाने जिंकलेली भाजप आणि २००९ मध्ये काठावर विजयी झालेली काँग्रेस आता २०१९ च्या लढाईत एकमेकांविरुद्ध अटीतटीचा सामना करण्याच्या जिद्दीने पेटली आहे. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचे वर्चस्व आहे. काँग्रेसचे गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे सामना काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, भाजपचे सुधाकर शृंगारे यापैकी कोणासाठीही सहज सोपा नाही.औरंगाबादेत चौरंगी लढतऔरंगाबादेत चौरंगी लढतीची शक्यता आहे. २० वर्षांपासून शिवसेनेचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे याही वेळी उमेदवार आहेत. महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड हे मैदानात उतरले आहेत. शिवस्वराज बहुजन पक्षातर्फे आ. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई मराठा मतांची समीकरणे जुळवत आहेत. मुस्लिम- दलित मतांवर एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांची भिस्त आहे.