मुंबई - मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनीउद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले नसते असा दावा राज यांनी सभेतून केला. बाळासाहेब ठाकरे असताना त्यावेळी काय घडले याबाबतचा खुलासा राज ठाकरे यांनी सभेत केला. या दाव्यानंतर आता नारायण राणेंचे चिरंजीव आमदार नितेश राणेंनीही गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, शिवसेना सोडण्यास नारायण राणेंना भाग पाडले हे वास्तव आहे. राज ठाकरेंनी जे सांगितले ते बरोबर आहे. बाळासाहेबांनी जेव्हा राज ठाकरेंना फोन केला तेव्हा मागून आवाज येत असल्याचं म्हटलं होते. मागून उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना धमकी दिली होती. तुम्ही राणेंना परत घेतले तर मी माझ्या मुलाबाळासंह मातोश्री सोडून जाईन असं वडिलांना धमकी दिली. त्यामुळे बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका आहे. ही वस्तूस्थिती बाळासाहेब आणि नारायण राणे यांच्यात झालेली चर्चा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राणेंनी शिवसेना सोडत असताना त्याचे प्रमुख कारण वडील आणि मुलामध्ये भांडण नको म्हणून शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब देवमाणूस होते. त्यांना आजही आम्ही पुजतो. बाळासाहेबांना सोडणे नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे कुणालाही सोडणे सोप्पे नव्हते. पण एकमेव उद्धव ठाकरेंमुळे हे कडवट शिवसैनिक ज्यांना बाळासाहेबांनी घडवले. मुलगा जेव्हा पित्याला अशी धमकी देतो तेव्हा त्यांना नाईलाजाने बाळासाहेबांना ही भूमिका घ्यावी लागली. ज्या माणसावर महाराष्ट्र सहानुभूती दाखवतो तो कसा आहे हे महाराष्ट्राला कळायला हवे. जो स्वत:च्या वडिलांना धमक्या देऊ शकतो. जबरदस्ती करू शकतो. वडिलांनी उभी केलेली संघटना संपवण्याचं कारण हे उद्धव ठाकरेच आहेत असं आमदार नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, भविष्यात कधीतरी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांना एक तास मुलाखतीसाठी बोलवा. या १ तासाच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंवर कुणीही सहानुभूती दाखवणार नाही एवढे मी विश्वासाने सांगू शकतो. लोक चपलेने मारतील. मराठी माणूस आणि शिवसेनेशी खऱ्या अर्थाने कुणी गद्दारी केली तर त्यांचे नाव उद्धव ठाकरे आहेत असा टोला आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.