मुंबई - मुंबईतील शिंपोली, बोरिवली पश्चिम येथे 'अटल स्मृती उद्याना'चे गुरुवारी लोकार्पण झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ अटल स्मृती हे उद्यान उभारण्यात आले आहे. रेकॉर्डब्रेक वेळेत या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अटलजींच्या स्मर्णार्थ अटल स्मृती उद्यानाची निर्मिती वेगाने होऊ शकते, तर मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला उशीर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अटल स्मृती या उद्यानाचे नुकतेच लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे या लोकर्पण सोहळ्याला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. परंतु, मागील साडेचार वर्षे सत्तेत असून देखील शिवसेनेला स्मारक उभारता आले नसल्याची टीका शिवसेनेवर करण्यात येते. त्यातच आता अटलजी यांच्या निधनानंतर काही दिवसांतच अटल स्मृती या उद्यानाचे लोकर्पण करण्यात आले आहे.
१६ ऑगस्ट २०१८ रोजी अटलजी यांचे निधन झाले होते. त्यानंतर रेकॉर्डब्रेक वेळेत अटलजी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ उद्यान उभारण्यात आले. उद्यान उभारण्यात आलेल्या जागेवर १५ वर्षांपूर्वी कचरा टाकण्यात येत होता. त्याच ठिकाणी आता उद्यान उभारण्यात आले आहे. आभासी वास्तविकता, अटलजींशी संवाद, होलोग्राम तंत्रज्ञान, भित्तिचित्र, शिल्प, अणुचाचणी, कारगील युद्धातील बंकर, भारतीय संविधानाच्या डीजीटल वाचनाची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांचा उद्यानात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. याला सहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असून यापैकी साडेचार वर्षे शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील बाळासाहेबांच्या स्मारकाला उशीर का, याचं उत्तर शिवसैनिक शोधत आहेत.
याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीच्या मुद्दाला हात घातला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना घेऊन आयोध्या दौरा केला होता. त्यावेळी उद्धव यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्यावर केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला होता.