मुंबई : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी माहिती असतानादेखील राम नाईक यांनी ती दडवली असेल, तर त्यांच्या विरोधात भादंविच्या २०१ व २०२ अन्वये गुन्हे दाखल का केले जाऊ नयेत, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व वसई-विरारचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सिनेअभिनेते गोविंदा निवडून आले, असा गौप्यस्फोट राम नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति चरैवेति’ या पुस्तकात केला आहे. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २५ एप्रिल रोजी झाले होते.१९९९ ते २००४ दरम्यान केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या नाईक यांचा ‘विरार का छोरा’ अशी ओळख असलेल्या गोविंदाने ११ हजार मताने पराभव केला होता. या पराभवाच्या कटू आठवणी जागवताना नाईक यांनी म्हटले आहे की, तीन वेळा खासदारकी मिळाल्याने मुंबईच्या विकासात मोठे योगदान देऊनही पराभव झाल्याने मी व्यथित झालो होतो. तो पराभव पचविणे कठीण गेले. गोविंदाने दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकली, असा आरोपही त्यांनी केला आहे.यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, ‘दाऊद इब्राहिमने गोविंदाला मदत केल्याची माहिती राम नाईक यांच्याकडे होती, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता. भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ असलेला आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या कारवायांची माहिती नाईक यांनी नेमकी पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच का उघड केली? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. अनेकदा पुस्तकाला प्रसिद्धी मिळावी, म्हणून लेखक सनसनाटी मजकूर लिहितात. नाईक यांनीदेखील हाच प्रकार केला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. केंद्रातील मंत्री पदापासून राज्यपाल पदापर्यंत अनेक संवैधानिक पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्या राम नाईक यांच्याकडून हा प्रकार अपेक्षित नव्हता, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)हा तर मतदारांचा अवमान - गोविंदाराम नाईक यांनी केलेला आरोप गोविंदाने फेटाळून लावला. दाऊदच्या मदतीने मी निवडून आलो असे म्हणणे, हा तर मतदारांचा अवमान आहे. नाईक यांनी विनाकारण मला आणि मतदारांना बदनाम करू नये, असे गोविंदा म्हणाला.
नाईकांवर गुन्हा का नाही?
By admin | Published: May 04, 2016 2:48 AM