अपात्र का करू नये? शरद पवार गटाच्या आठ आमदारांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 06:35 AM2023-10-29T06:35:12+5:302023-10-29T06:35:32+5:30
अजित पवार गटाने शनिवारी दाखल केली याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेनेपाठोपाठ पक्ष कुणाचा, हा वाद आता राष्ट्रवादीतही रंगला आहे. शरद पवार गटातील आठ आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिकाच अजित पवार गटाने शनिवारी दाखल केली आहे. त्यावर आता विधिमंडळाकडून शरद पवार गटातील आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड पाठोपाठ आणखी आठ आमदारांना नोटीस बजावल्याने आतापर्यंत १० आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना नोटीस दिलेली नाही. नवाब मलिक कोणत्या गटात आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांनाही कोणतीही नोटीस बजावलेली नाही.
'या' आमदारांना बजावली नोटीस
अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षीरसागर.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
आमदार अपात्रतेबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर येत्या सोमवारी, ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.