मुंबई – आमचे धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाशी व्यक्तिगत भांडण नाही. हेमा मालिनी, सनी देओलही हे भाजपाचेच खासदार आहेत. त्यांनी ६०-७० कोटींचे कर्ज घेतले होते आणि हे कर्ज ते फेडू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या बंगल्याचा लिलाव बँकेने काढला. त्याची नोटीसही सनी देओलला देण्यात आली. जाहिरातही दिली होती. पण २४ तासांत दिल्लीतून सूत्रे हलली आणि लिलाव थांबवला गेला, मग हाच न्याय नितीन देसाई यांना का लावला नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर घणाघात केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, नितीन देसाईंनी दिल्लीतील अनेक नेते, मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. माझे स्वप्न वाचवा असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते असं तिथली लोकं सांगतात. परंतु त्यांना वाचवले नाही. दिल्लीतून हे मुंबईत आले त्यानंतर एनडी स्टुडिओला जात त्यांनी आत्महत्या केली. नितीन देसाईंना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. जो न्याय सनी देओलला लावला, कारण ते भाजपाचे खासदार आहेत. स्टार प्रचारक आहेत. मग आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का असा परखड सवालही त्यांनी भाजपा सरकारला विचारला.
२०२४ मध्ये भाजपा सत्तेवर येणार नाही
भाजपाने त्यांच्या उद्योगपती मित्राला ३९०० कोटींचा फायदा कसा मिळवून दिला याबाबत शक्तिसिंह गोहिल यांनी काढलेले प्रकरण गंभीर आहे. केंद्र असो वा महाराष्ट्र प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार होतोय, रोज अशी प्रकरणे बाहेर येत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. परंतु त्यावर दंगली पेटवायच्या, लव्ह जिहादसारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे आणि मोर्चा काढायचा, बाकी त्यांच्याकडे काय आहे? पण कितीही केले तरी २०२४ साली भाजपा महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही अशी गॅरंटी इंडिया आघाडीकडून मी देतो असा दावा खासदार संजय राऊतांनी केला.
दरम्यान, चंद्रयान ३ चे श्रेय हे भारतातील वैज्ञानिकांचे आहे. जिथे तिरंगा फडकवला गेला तिथे महान वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचे नाव द्यायला हवे होते. त्यांना भारतरत्न द्यावा. पंडित जवाहरलाल नेहरू, विक्रम साराभाई यासारख्या लोकांनी काम केले त्याचे फळ आता चंद्रयान ३ च्या रुपाने मिळतेय. पण वैज्ञानिक, विज्ञानाला विसरून हिंदुत्व आणले जाते. आम्हीही हिंदुत्ववादी आहोत. परंतु काही गोष्टी विज्ञानाशी संलग्न असतात असं वीर सावरकर म्हणायचे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्याही धर्माचे आक्रमण योग्य नाही असं सांगत संजय राऊतांनी चंद्रयान ३ ज्याठिकाणी उतरले त्या जागेला शिवशक्ती नाव देण्यात आले त्यावरून टीका केली.