मुंबई - व्हेलन्टाइन डेच्या निमित्ताने अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली त्यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना कमालीचा विचित्र प्रकार आहे. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत बोलताना पंकजा मुंडेंनी ट्विट केलंय की, मुलींनाच शपथ का? त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अॅसिड फेकणार नाही. जिवंत जळणार नाही. वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितले तर त्याला जबरदस्त जवाब देणार असं त्यांनी सांगितले.
'व्हॅलेंटाइन्स डे'च्या निमित्ताने तरुणाई गुलाबी रंगात रमली असताना, चांदूर रेल्वेच्या महिला कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ घेतली. हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न करणार नाही आणि कुटुंबीयांनी हुंडा देऊन लग्न लावलेच तर भविष्यात सुनेसाठी हुंडा घेणार नाही, अशीही शपथ विद्यार्थिनींनी घेतली मात्र प्रेमविवाह करणार नाही या शपथेवरुन वादंग निर्माण झालं आहे.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेम्भुर्णी गावात सुरू आहे. त्या शिबिरात ही शपथ घेण्यात आली. प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामागे प्रेमातून सातत्याने होणाऱ्या हिंसक घटनांची पार्श्वभूमी आहे. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थांना ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर दंदे यांनी मार्गदर्शन केले. तरुण विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराचा विषय देखील त्यादरम्यान उलगडण्यात आला. त्यानंतर मुलींना ही शपथ देण्यात आली.
हिंगणघाट घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. अनेकदा एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. इतकचं नाही तर कोल्हापूरात प्रेमविवाह केल्यामुळे मुलीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार घडला होता. मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याऐवजी मुलींनाच बंधनात अडकवून ठेवण्यावरुन अनेकांनी टीका केली आहे. त्यामुळे या प्रकारावर शिक्षण विभागाकडून काय कारवाई होणार का? हे पाहणे गरजेचे आहे.