कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले, असा सवाल माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे उपस्थित केला.पानसरे यांच्या खुनानंतरच्या घटनाक्रमाची माहिती देण्यासाठी शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते़ यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे-पाटील हे उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ रघुराज थोरात हे पानसरेंना मुंबईत हलविण्यासाठी अॅस्टर प्रशासनावर सातत्याने दबाव आणत होते, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. पानसरे हे अॅस्टरमध्ये उपचार घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १७ फेबु्रवारीला जत (सांगली) दौऱ्यावर होते़ या दौऱ्यावर असतानाही ते पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत़ पानसरे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यात आला नाही किंवा त्यांच्या अंत्यविधीस शासनाचा प्रतिनिधीही उपस्थित नव्हता़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तपास प्रकरणात राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी तपास उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली व्हावा , अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केली़
पानसरेंना मुंबईला का हलविले?
By admin | Published: September 22, 2015 2:05 AM