माझी संमती होती तर तीन दिवसांनी राजीनामा का दिला? शरद पवारांचा अजितदादांवर गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 06:06 PM2024-04-22T18:06:50+5:302024-04-22T18:11:50+5:30
Sharad pawar vs Ajit pawar: आता जसे उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र भुमिका मांडतो, तसे आम्हाला हवे होते. शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून माझा काही वैयक्तीक निर्णय आहे की नाही, असा सवाल शरद पवार यांनी अजित पवारांना केला आहे.
लोकसभा निवडणुकीत मुलगी विरुद्ध सून अशी लढत ऐन रंगात आलेली असताना अजित पवारांनीशरद पवारांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार आक्रमक झालेले असताना आता शरद पवारांनीही शड्डू ठोकले असून अजित पवारांच्या आरोपाला उत्तर देण्यास मी बांधील नाही असे सांगत जोरदार हल्लाबोल केला आहे.
२०१४ मध्ये आम्ही भाजपाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला, परंतु पाठिंबा दिला नाही. शिवसेनेला वेगळे करण्याचा तो डाव होता. राजकीय स्ट्रॅटेजिचा भाग होता. २०१९ मध्ये शिवसेनेला वेगळे करून त्यांच्यासोबत जायचा आमचा प्लॅन होता आणि तो यशस्वी झाल्याचे पवार म्हणाले. आता जसे उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र भुमिका मांडतो तसे आम्हाला हवे होते. भाजपासोबत जायचा माझा प्लॅन नव्हता, तेव्हाच्या सहकाऱ्यांचा तो निर्णय होता. शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून माझा काही वैयक्तीक निर्णय आहे की नाही, असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला आहे.
जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा मी घेतला. अजित पवारांना आरोप केले तो त्यांचा प्रश्न आहे. मी उत्तरे देण्यास बांधील नाही, असे म्हणत पवारांनी अजित पवारांच्या आरोपांना झिडकारले आहे. २०१९ मध्ये भाजपासोबत जाण्यासाठी माझी मान्यता होती मग अजित पवारांनी तीन दिवसांत राजीनामा का दिला? असा सवाल शरद पवारांनी केला आहे. त्यांना भाजपसोबत जायचे नव्हते तर सत्तेत जायचे होते. लोकशाहीत दरवेळी सर्वांना सत्तेत सहभागी होता येत नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक झाली नसती तर आनंदच झाला असता. परंतु आता एकाने वेगळी भुमिका घेतली आहे. राजकारणात जर कोणी वेगळी भुमिका घेतली तर आपण काय करू शकतो, असे पवार म्हणाले. २०१९ मध्येही मला त्यांची भुमिका आवडलेली नव्हती असेही पवारांनी स्पष्ट केले.