मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विद्येची देवता सरस्वतीवर केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची?' असे विधान आमदार छगन भुजबळांनी केले होते. त्या विधानावर आता स्वतः भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.
'मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार'
माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, 'हे वक्तव्य मी ज्या दिवशी बोललो, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाविरोधात बोललो असतो तर ती वेगळी गोष्ट आहे. मी हेच बोललो होतो की, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले, त्यांचा आदर करायला हवा. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते,' असे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले.
'आपल्याला सरस्वतीने शिकवले नाही'
ते पुढे म्हणाले की, 'आपल्याला सरस्वतीने काही शिकवले नाही, त्यामुळेच सरस्वती पूजनाचा प्रश्न येतोच कुठे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. मीदेखील हिंदूच आहे, हिंदुंसाठी बरीच कामे केली आहेत. देवीच्या दर्शनाला देखील जातो. पण, देवीऐवजी महापुरुषांचा सन्मान होणे गरजेचे आहे,' असेही भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळ म्हणाले होते की, 'शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिले नाही, ज्यांनी आपल्याला शिकवले नाही. असेलच शिकवले तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची?' असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता.