महाराष्ट्रात जसजशी लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्याकडे चालली आहे, तसतशी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकाच पक्षात असलेले नेते जेव्हा वेगळे झाले आणि लढू लागले आहेत, तेव्हा ते एकमेकांना त्यांची गुपिते बाहेर काढण्याच्या धमक्या भर व्यासपीठावरून देऊ लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतरची पहिलीच मोठी निवडणूक आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेच्या आमदारांना घेऊन जेव्हा शिंदे सुरतला गेले होते, तेव्हा दिल्ली आणि मुंबईत जे काय सुरु होते, त्यावर शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे. तिकडे राष्ट्रवादीचे नेतेही शरद पवारांबाबत असेच गौप्यस्फोट करत सुटले आहेत. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन केला होता असा दावा केला आहे. त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्या सोबत येतो अशी ऑफरच उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिली होती, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
आम्ही सुरतला लपूनछपून नाही तर बोलता बोलता गेलो. जाहीरपणे गेलो होतो. आम्हाला परत बोलवायचे आणि आमचे पुतळे जाळायचे, पक्षातून हकालपट्टी करायची असा प्लॅन होता, असे शिंदे म्हणाले. काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला वाचविण्यासाठी आणि शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी आम्ही हे धाडसाचे पाऊल उचलले होते, असे शिंदे म्हणाले.
त्यांनी जी युती तोडायची चूक केलेली ती आम्ही दुरुस्त केली. मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही. पैशाचा मोह कुणाला? खोक्याचा मोह कुणाला? हे लोकांना माहित आहे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. मला संधी मिळाली. त्याचं मी सोनं करतोय, असेही शिंदे म्हणाले.