केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या दहा वर्षांत अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे. देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीने काम सुरू असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं. यासोबतच आमचं सरकार पर्यटनावर काम करत आहे. परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन दिलं जात आहे. पर्यटन केंद्रांचा विकास केला जात आहे. जुलैमध्ये आमचं सरकार विकसित भारताचा रोडमॅप सादर करेल. विमानतळांचा विस्तार केला जात आहे असंही सांगितलं.
आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे. "फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का?, आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही?" असा रोखठोक सवाल विचारला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील विमानतळ विस्ताराबद्दल सांगितलं. या संपूर्ण योजनेत महाराष्ट्राला समान हिस्सेदार का मानलं जात नाही? पुण्याच्या प्रस्तावित नवीन विमानतळावर एकही शब्द नाही."
"मविआ सरकारने प्रस्तावित केलेलं सध्याच्या सरकारद्वारे रद्द करण्यात आलं. महाराष्ट्राच्या उद्योग, वाणिज्य आणि शेतीच्या वाढीसाठी पुण्याच्या विमानतळाची खरी गरज आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल. सध्याच्या सरकारला जुन्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यातही रस नाही, जे आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, 5 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही? फक्त महाराष्ट्रावरच हा अन्याय का?" असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अर्थमंत्र्यांनी 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, आता 3 कोटींचं लक्ष्य असल्याचं सांगितलं आहे. "लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे, लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आलं आहे" अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.