एकनाथ शिंदेंचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटासोबत मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसत जरी असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात असे वक्तव्य भर सभेत करून महायुतीत वादाची ठिणगी टाकली होती. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असे ऐकून घेण्यापेक्षा महायुती सरकारमधून बाहेर पडलेले बरे, असे अजित पवारांना म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाने छेडले आहे.
महायुतीमध्ये अंतरकलह लोकांच्या समोर आला आहे. ज्या प्रकारे तानाजी सावंत म्हणाले अजित पवार आणि त्यांचे नेते यांना बैठकीत बघतो त्यावेळी उलटी आल्यासारखे होते. त्यानंतरही अजित पवार आणि त्यांचे नेते काही बोलत नाहीत. त्यांच्यावर कसला दबाव आहे? असा सवाल ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी उपस्थित केला आहे.
ती वेळ होती जेव्हा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागायचे. त्यांचा इतका अपमान होत आहे, कधी भाजपकडून कधी आरएसएस, कधी शिंदे गटाकडून. अजित पवार यांच्यावर ईडी सीबीआयचा दबाव आहे का? असा सवाल दुबे यांनी केला आहे.
तसेच अजित पवार शरद पवार यांच्यासोबत असते तर असे झाले नसते. तुम्ही अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये होता, पण मित्रपक्ष कधीही तुम्हाला असे बोलले नाहीत. तुमची परिस्थिती दुर्दैवी झाली आहे. मग का सहन करत आहात, असा सवाल दुबे यांनी विचारला आहे.