2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का? अजित पवारांना राजकारण कळलेच नाही : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:07 PM2024-04-20T22:07:00+5:302024-04-20T22:07:25+5:30
अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते.
भाजप आणि अजित पवार गट हे शरद पवार कसे भुमिका बदलतात, सोईची भुमिका घेतात आणि राजकारण करतात याचे दावे करत सुटले आहेत. यापैकीच एक दावा म्हणजे राष्ट्रवादीने २०१४ ला भाजपला सत्ता स्थापन करताना बिनशर्त पाठिंबा दिलेला. यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपला पाठिंबा देण्याबाबत जरूर बोललो असेन पण तसे काही केले नाही. आम्ही आमचा रस्ता कधीच सोडला नाही. काहीही झाले तरी शिवसेना आणि भाजपला एकत्र येऊ द्यायचे नव्हते. यामुळे मी काही गोष्टी बोललो होतो, असे पवार म्हणाले. अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते. यावर शरद पवार यांनी अजित पवारांना तेव्हाचे राजकारण कळले नाही, असा टोला हाणला.
अशा चर्चा होत असतात. शेवटी निर्णय महत्वाचा असतो. निर्णय काय तर मी भाजपबरोबर काही गेलो नाही. उद्या तसे कुणी सुचवले, तुम्हीही सुचवू शकता. सुचवले म्हणजे स्वीकारले असे होत नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. याचबरोबर अजित पवारांनी १९८९ ला मी शेती करायचा काटेवाडीला जातो, राजकारण अजितला करू द्या असा दावा केला होता. यावरही शरद पवारांनी तो दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.