- दिनकर रायकरमुंबई : धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची गेल्या काही दिवसांतील विधाने ऐकली तर ती काहीशी खचलेल्या मनाची वाटू लागली आहेत. देशभर मी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. पण खासदार, आमदार त्यात अडथळे आणत आहेत. बऱ्याच ठिकाणचे कंत्राटदार त्यांच्या अशा वागणुकीमुळे पळून तरी जात आहेत किंवा त्यांना हाकलले तरी जात आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी ‘आमचे काय’ किंवा ‘आम्हाला काय’ हा प्रश्न विचारून ठेकेदारांना त्रस्त करत आहेत. या अशा वागण्याने कामे होणार कशी, अशीही खंत जाहीरपणे अनेक कार्यक्रमातून गडकरी यांनी बोलून दाखवली आहे.आपण आतापर्यंत २७ लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. पण एकही ठेकेदार मला कधी भेटला नाही किंवा मी त्याला कधी बोलावले नाही. एवढी पारदर्शक कामे मी गेली काही वर्षे सातत्याने करत आलो. आम्ही काही पाप करत नाहीत, देशाचा विकास करत आहोत. पण त्यात या अशा अडचणींनी मोठे अडसर निर्माण करणे सुरू केले आहे, असेही गडकरी म्हणाले.गडकरी यांना अशा असहाय्य स्थितीत जनतेने कधी पाहिले नाही. बिनधास्त स्वभावाचा, मनात येईल ते स्पष्टपणे बोलून दाखवणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी कधी कोणाची भीडभाड ठेवलेली नाही. राज्यात युती सरकारमध्ये बांधकाममंत्री असतानाही त्यांनी हा स्वभाव बदलला नव्हता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई पुणे एक्स्प्रेसवे धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला करायचा होता. त्यासाठी त्यांनी तत्कालिन मंत्री प्रमोद महाजन यांच्यामार्फत आग्रह धरला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गडकरी गेले. राज्य सरकारमधील अधिकारी कमी खर्चामध्ये हा महामार्ग करण्यास सक्षम आहेत, हे त्यांना पटवून दिले. त्यातून किती पैसे वाचतील हेही त्यांनी सांगितले, मी ठराविक मुदतीत हे काम केले नाही तर तुम्ही मला मंत्रिमंडळातून काढून टाका, असेही ठणकावून सांगितले. बाळासाहेब ठाकरे त्यामुळे गडकरींच्या बाजूने उभे राहिले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वेळेआधीच पूर्ण झाल्यावर बाळासाहेबच नव्हे, तर धीरुभाई अंबानी यांनीही गडकरी यांच्या कर्तुत्वाचे कौतुक केले होते.हेच गडकरी आता एकदम हताश व निराश दिसत आहेत. आपल्या विभागाची काम करण्याची खूप इच्छा आहे. पण आमदार, खासदार अडथळे आणतात, असा सूर गडकरींना शोभत नाही. त्यांनी स्वभावानुसार कामाच्या आड येणाºया आमदार, खासदारांची नावे सीबीआयला द्यावीत वा त्यांच्या अशा नेत्यांची जाहीर खरडपट्टी काढावी. अवघा देश त्यांच्या या स्वभावाचे कौतुकच करेल.अशा नेत्यांवर कारवाई करा असे सीबीआयला सांगून हा प्रश्न सुटणार नाही आणि गडकरींचा तो स्वभाव नाही. हे झाले गडकरींच्या बाजूने. मात्र ज्या आमदार, खासदारांविषयी गडकरी यांनी आक्षेप घेतले, त्यापैकी एकही नेता या आक्षेपाबद्दल ब्र शब्द काढायला तयार नाही. त्यांना गडकरींच्या विधानाचे काहीही वाईट वाटलेले दिसत नाही. याचा अर्थच गडकरी जे बोलत आहेत, त्यात तथ्य आहे. हे जर खरे असेल, तर ती जास्त गंभीर बाब आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एवढे अगतिक का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 6:23 AM