नागपूर - राज्याच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूरातील राजभवन येथे पार पडला. या मंत्रिमंडळात अनेक धक्कादायक तंत्र वापरण्यात आले. त्यात काही ज्येष्ठांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले तर काही नव्यांना संधी देण्यात आली. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती. परंतु नव्या मंत्रिमंडळात पडळकरांना स्थान नाही. त्यामुळे धनगर समाजातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मारकडवाडीतील भाषणामुळे पडळकरांचं मंत्रिपद हुकलं का असा प्रश्न नागपूरातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मारकडवाडीतील भाषण त्यांना नडलं असं मला वाटत नाही. गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेत निवडून आलेत. त्याआधी विधान परिषदेत होते. उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. थोडे आक्रमक आहेत. बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे हे निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितले. पण एक चांगले भविष्य असणारा तो नेता आहे असं त्यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर हे मागील ८-१० वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेतलं नाव आहे. शरद पवारांवर थेट आक्रमकपणे टीका करणारे नेते असं त्यांची ओळख आहे. अनेकदा ते त्यांच्या विधानामुळे माध्यमात चर्चेत राहतात. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. त्यामुळे यंदाच्या महायुती सरकारमध्ये भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्याचं बोलले जाते.
मारकडवाडीतील भाषण नडलं?
विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे ईव्हीएमवरून मोठं आंदोलन झाले. या आंदोलनावेळी भाजपाकडून ईव्हीएमच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्यात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर विखारी टीका केली. १०० शकुनी मेल्यावर शरद पवार जन्माला आले असं त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत असंही वादग्रस्त विधान त्यांच्याकडून करण्यात आले होते. त्यामुळे पडळकरांना मंत्रिपदावरून डावललं गेले का अशी चर्चा आता होत आहे.