मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासह काही समर्थक आमदार गुजरातच्या सूरत येथे हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. तर शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतला पोहचले. यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले.
या संवादात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं संतापून म्हणाले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले? या संवादात एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतायेत. भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतायेत असा सवाल त्यांनी केला.
त्याचसोबत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेना-भाजपा युती व्हावी हा आपला मुद्दा आहे. मी कुठलाही पक्षविरोधी कारवाई केली नाही तरी गटनेते पदावरून काढलं. काही नेते माझ्याशी फोनवर बोलतायेत. पण प्रसारमाध्यमांशी वेगळा संवाद का? शिवसेनेचे नेते माझ्याशी चर्चा करायला येत असतील तर इतर नेत्यांना याची कल्पना नाही का? जवळपास १५ मिनिटे हा संवाद झाला. लवकरच आपली भूमिका जाहीर करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर मिलिंद नार्वेकर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ गुजरातच्या सूरत हॉटेलला गेले होते. गटनेतेपदावरून काढल्याबाबत तीव्र नाराजी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हिंदुत्वाच्या भूमिकेवरून शिवसेना-भाजपा यांच्यात युती व्हावी मग माझं चुकलं काय? मी पक्षहिताच्याविरोधात बोललो नाही. कुठलाही गट स्थापन केला नाही मग कारवाई का केली हा मुद्दा उपस्थित केला आहे.