लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना का आणली?; CM एकनाथ शिंदेंचं विरोधकांना थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:51 PM2024-09-26T12:51:51+5:302024-09-26T12:53:42+5:30
निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
मुंबई - आमचं सरकार गरिबांचे, सर्वसामान्यांचे आहे. मग आमच्यासाठी काय करणार की नाही असं सर्वसामान्य विचारतात. लाडकी बहीण योजना एका दिवसांत आली नाही, लोकसभा निकालानंतर आम्ही ठरवले आणि अंमलात आणले असं होत नाही. त्यासाठी एक दीड वर्षापासून त्याची तयारी सुरू होती. गरिबी आम्हीही पाहिली, ग्रामीण भागात असो वा शहरी भागात गरिब महिला घर कसं चालवतात हे आम्हाला माहिती आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज दीड हजार महिन्याला आणि वर्षाला १८ हजार मिळतात. घरात २ बहिणी असल्या तर ३ हजार महिन्याला आणि वर्षाला ३६ हजार मिळतात. घरातील मुलींना उच्च शिक्षणासाठी सरकार खर्च करतंय. कर्नाटकात काँग्रेसनं ही योजना आणली आणि निवडणुकीत जिंकल्यानंतर आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून बंद केली. केंद्र सरकारने पैसे द्यायला हवेत बोलले. हिमाचल प्रदेशात काँग्रेसनं आश्वासन दिले, त्यानंतर बोलले प्रिटिंग मिस्टेक होती बोलले. खटाखट खटाखट पैसे देणार होते ते कुठे गेले? असा सवाल त्यांनी विचारला. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात शिंदेंची मुलाखत घेण्यात आली.
तसेच निवडणूक येईल जाईल, सरकार येईल जाईल पण लोकांसोबत आमचं नाते निवडणुकीपुरतं नाही. पूर्ण वर्षाचं निधी तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय, महिला अर्थव्यवस्थेला चालना देतायेत. त्यांना मिळणारे पैसे बाजारात येतात. मोदींच्या १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंसोबत समोरासमोर चर्चा करायला तयार...
दरम्यान, जर उद्धव ठाकरे माझ्यासमोर येणार असतील तर मीदेखील तयार आहे. मी माझे काम सांगेन, पण ते काय सांगणार..? घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते, मास्क लावा हे सांगितले. आमचं सरकार आल्यानंतर सर्वांवरील निर्बंध हटवले, सणउत्सव सुरू केले. अनेक प्रकल्प रखडले होते ते सुरू केले. मला काय मिळणार यापेक्षा जनतेला काय मिळणार हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.