मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी सुरू केलेली एसटीमधील ‘स्पॉट’ वाय-फाय सेवा बंद झाली आहे. एसटीमध्ये मोफत वाय-फाय पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे.जानेवारी २०१७पासून महामंडळाच्या ताफ्यातील एसटीत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली. जून २०१८पर्यंत महामंडळाच्या सुमारे १४ हजार एसटींमध्ये स्पॉट वाय-फाय कार्यान्वित केले आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून एसटीतील वाय-फाय बंद असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या असून यात नाशिक आणि औरंगाबाद विभागातील एसटींच्या तक्रारींचा समावेश आहे.महामंडळातील अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, वाय-फाय पुरविणाºया यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा बंद झाली. एसटीत वाय-फाय बसविणाºया खासगी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.दरम्यान, वाय-फाय सुरू केल्याचा दावा महामंडळाच्या मुख्यालयाकडून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात मात्र वाय-फाय बंदच असल्याचे पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी याबाबत संकर्प साधला असता त्यांनी सावध पवित्रा घेत ‘माहिती घेऊन कळवतो,’ अशी प्रतिक्रिया दिली.स्पॉट वायफाय म्हणजे काय?विशिष्ट माहिती संग्रहित करून केवळ तीच माहिती प्रवाशांना उपलब्ध होईल, या तंत्रज्ञानाला स्पॉट वाय-फाय म्हणतात. महामंडळाच्या सुमारे १५ हजार एसटींमध्ये स्पॉट वाय-फाय बसविण्यात आले आहे. एसटीतील स्पॉट वाय-फायमध्ये केवळ चित्रपट, चित्रपट गीते आणि हास्यमालिका यांचा समावेश आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील वाय-फाय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 2:13 AM