विशेष प्रतिनिधी ।मुंबई : अकोला जिल्ह्यातील निंभोरा येथील आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या पत्नीस तिची तक्रार न घेता अडीच तास पोलीस ठाण्यातच थांबवून ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप भाजपाचे अकोला येथील आमदार रणधीर सावरकर यांनी आज विधानसभेत केला.त्यांनी सांगितले की, किशोर ताथोड या शेतक-याने काही दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्या केली. मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाºयांनी त्याच्याकडे कर्जवसुलीचा तगादा लावला होता. एक दिवस तो घरी नसताना हे कर्मचारी त्याच्याकडे गेले आणि पत्नीलाही धमकावले आणि वाईट पद्धतीने मागणी केली. ताथोड यांनी त्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्याची पत्नी सात महिन्यांची गरोदर आहे. या कंपनीविरुद्ध तक्रार करण्यासाठी ताथोड ती अकोला येथील अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली असता तेथील पोलीस अधिकारी राणे यांनी लवकर तक्रार घेतली नाही आणि अडीच तास त्या महिलेस थांबवून ठेवले. या प्रकरणी मोरे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सावरकर यांनी सभागृहात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
अकोल्यातील शेतक-याच्या विधवेस पोलिसांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:54 AM